28 October 2020

News Flash

डोंबिवलीत इमारतीला भीषण आग; कापडाच्या गोडाऊनसह प्रिंटींग प्रेस जळून खाक

लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

ठाणे : डोंबिलीतील इमारतीला लागलेली भीषण आग.

डोंबिवली पूर्वकडे स्टेशन जवळच्या बाजारात असलेल्या कापडाच्या गोडाऊनसह प्रिंटींग प्रेसला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग विझविताना अग्निशामकदलाची पुरती दमछाक झाली. तब्बल साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामकदलाला यश आले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

उर्सेकर वाडीमध्ये दाट वस्तीत असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरमध्ये घरे आणि दुकानांचे गाळे तसेच गोडाऊन आहेत. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काही रहिवासीही राहतात. तळ मजल्यावर २७ लहान-मोठे दुकानी गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये प्रामुख्याने कपड्यांची दुकाने आहेत. तर एका गाळ्यात स्मॉल वंडर्स नावाची नर्सरी शाळा देखील आहे. दुसऱ्या मजल्यावर कार्यालये व दुकानदारांची गोडाऊन्स आहेत. तिसऱ्या मजल्यावर रमण सेठीया यांच्या मालकीची सेठीया प्रिंटींग प्रेस आहे. या प्रेसमध्ये पुस्तक, पत्रके, वगैरेंची छपाई करण्यात येते. तर त्याच्याच शेजारी रॉमसन्स व प्रमोशन युनिफॉर्म नामक शालेय विद्यार्थ्यांच्या तयार कपड्याचे गोडाऊन आहे.

दुपारी १२ च्या सुमारास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. या मजल्यावरून आग व धुराचे लोट बाहेर पडले. हे पाहून जिवाच्या भितीने इमारतीतील सर्वांनी बाहेर पळ काढला. अग्निशामकदलाच्या वाहनांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. आगीने रौद्ररूप धारण केले होते.

कापडाच्या गोडाऊनमध्ये तयार कपडे व प्रेसमध्ये कपडे, कागद, प्लास्टीक आणि रबराचे साहित्य असल्याने धूर मोठ्या प्रमाणावर पसरली होती. ठाकुर्ली, आयरेगावापर्यंत हे धूराचे साम्राज्य पसरले होते. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आग लागली असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामकदलाला तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने ही गर्दी हटवताना पोलिसांच्याही नाकीनऊ आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 6:48 pm

Web Title: the printing press kit with the godown of the cloth in the horrific fire that took place in dombivli
Next Stories
1 ठाण्यात ३ हजार स्वस्त घरे!
2 बाजाराची मनकामनापूर्ती
3 मंडपावरील कारवाईचा ‘देखावा’
Just Now!
X