रसद अपुरी पडू लागल्याने ज्येष्ठ, अपंग, अनाथांची परवड

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात टाळेबंदी लागू असल्याने त्याचा फटका आता अनेक समाजसेवी आश्रमांना बसू लागला आहे. टाळेबंदीमुळे दात्यांचे दातृत्व घटले असून विविध मर्यादांमुळे आश्रमांना मिळणाऱ्या निधी आणि मदतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अशावेळी आपल्या आश्रमातील मर्यादित साधनांवर अनाथ, गतिमंद मुलामुलींची आणि ज्येष्ठांची सोय किती काळ आणि कशी करायची असा सवाल आश्रमांच्या संचालकांपुढे उभा ठाकला आहे.

सध्या देशभरात लागू असलेली टाळेबंदी त्यामुळे वाढते की काय अशी भीतीही आहे. त्यातच टाळेबंदीमुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. याच टाळेबंदीचा फटका आता समाजसेवी आश्रम, शाळांना बसू लागला आहे. अंबरनाथ तालुक्यात अनेक समाजसेवी आश्रम आहेत. गतिमंद  मुले, अनाथ मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आश्रमांचा यात समावेश आहे. साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अशा समाजसेवी आश्रमांना मोठय़ा प्रमाणावर मदत देऊ  केली जाते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे अचानक आलेले अनेक निर्बंध आणि नंतर जाहीर झालेली टाळेबंदी यामुळे या समाजसेवी संस्था आणि आश्रमांना मिळणारी मदत एकाएकी थांबली. जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या गेल्याने जीवनावश्यक वस्तूंसह आश्रमातील मुला-मुलींची आणि ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही मिळणे दुरापास्त झाल्या आहेत. संचारावर मर्यादा आल्याने अनेक दाते मदतीसाठी पुढे येऊ  शकत नसल्याचेही समोर आले आहे. तर अनेक आश्रमांत सध्याचा उपलब्ध वस्तूंचा साठाही मर्यादित आहे. त्यामुळे एकीकडे टाळेबंदी, दुसरीकडे घटलेले दान आणि मदत आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारा साठा यामुळे आश्रमांचे संचालक चिंतेत पडले आहेत. तसेच या आश्रमांमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि सेवकांवरही संचारबंदीच्या मर्यादा असल्याने त्यांनाही आश्रमांपर्यंत पोहोचणे कठीण होते आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना अत्यावश्यक सेवांमध्ये सहभागी करून आश्रमात सेवा देण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आश्रमांतील व्यक्तींकडून होते आहे.

दात्यांकडून मिळणारी मदत कमी झाली आहे. तसेच आमच्या आश्रमात असलेल्या सेवकांनाही आश्रमात येण्यात अडचणी येत आहेत. यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

– कमलाकर राठोड,  संचालक, किनारा रेसिडेन्शियल स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केयर.