कल्याण-डोंबिवलीतील मोहिमेपासून मित्रपक्ष दूर; आपलाच कार्यक्रम ‘चोरल्याचा’ भाजपचा आरोप
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक केल्यानंतर केवळ राजकीय अपरिहार्यतेपोटी पालिकेत युतीने सत्ता स्थापणाऱ्या शिवसेना-भाजपमधील अंतर्गत मतभेद अद्याप कायम आहेत. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीच्या ‘परिवर्तनाचा’ नारा देत शिवसेनेकडून शनिवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या मोहिमेत भाजपला पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आले आहे. शहराच्या विकासकामांचा आढावा आणि नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी आयोजिलेल्या या मोहिमेतून भाजपला दूर ठेवून सेनेने आगामी राजकीय वाटचालीचे संकेतही दिले आहेत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेत स्वच्छ डोंबिवलीसाठी विविध कार्यक्रमांचा शुभारंभ ठाकरे करणार आहेत. यासाठी शिवसेनेकडून शहरभर जोरदार फलकबाजी करत ‘परिवर्तना’ची हाक देण्यात आली आहे. वर्षांनुवर्षे सत्तेत राहिलेल्यांकडून परिवर्तनाची ही हाक नेमकी कशासाठी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात असून, सत्तेत सहभागी असलेल्या भाजपला या मोहिमेपासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर चिखलफेक करणारे शिवसेना-भाजपचे नेते निकालानंतर मात्र सत्तेत एकत्र आले. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेत्यांची कोंडी कशी होईल यादृष्टीने भाजपचे नेते पावले उचलत आहेत. या पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या परिवर्तन मोहिमेनिमित्त शिवसेनेने भाजपला एकाकी पाडल्याचे चित्र दिसत असून कल्याणच्या विकासाचा चेहरा शिवसेनेच ठरवेल, असा संदेश यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीस सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर येथील विकासकामांच्या पाहणीसाठी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यादरम्यान शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कामांची सुरुवात होणार आहे.

शनिवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम महापालिकेचा आहे. स्वच्छ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ राहावे यासाठी भाजपच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु शिवसेना मात्र हा वैयक्तिक कार्यक्रम करत असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करावा.
– राहुल दामले, भाजप गटनेते
परिवर्तन अभियान हा केवळ शिवसेनेचा कार्यक्रम नसून शहरातील सर्व पक्षांचा त्यामध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा तळाचा क्रमांक आहे. हा बट्टा पुसून हे शहर पहिल्या दहांमध्ये यावे यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. शहराच्या स्वच्छतेबद्दल जाण असणाऱ्यांनी या अभियानात सहभागी व्हावे. ज्यांना व्हायचे नसले त्यांनी खुशाल दुर रहावे.
– राजेंद्र देवळेकर, महापौर