|| कल्पेश भोईर

वसई-विरार सध्या आजारी पडले आहे. वसईतील पुरानंतर नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिवताप, अतिसाराबरोबर डेंग्यूच्या आजाराने नागरिक त्रस्त आहे. पालिकेचा आरोग्य विभाग डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. वेळीच उपायोयजना केल्या नाहीत, तर परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.

वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजार पसरलेले असून डेंग्यूच्या रोगाने थैमान घातलेले आहे. शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिकेने मात्र डेंग्यूचे २१ रुग्ण असल्याचा दावा केला आहे आहे.एखाद्या आजारावर वेळीच उपाय झाला नाही तर त्याची व्याप्ती वाढत जाते. सध्या डेंग्यूच्याबाबतीतही तीच अवस्था झाली आहे. पालिका प्रशासन डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यात अयशस्वी झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समितीवर विविध पक्ष आणि संघटनांचे मोर्चे निघत आहेत. डासांना रोखण्यासाठी साधी धूरफवारणीही योग्य प्रकारे होत नसल्याच्या नागिरकांच्या तक्रारी आहेत.

जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर शहरात अपेक्षेप्रमाणे रोगराईचा फैलाव झालेला आहे. त्यात डेंग्यू या साथीच्या आजाराने डोके वर काढले. त्यामुळे शहरच आजारी पडलेले आहे. शहराचा पूर ओसरला पण अनेक ठिकाणी डबक्यात, अडगळीत पाणी साठून राहिले होते आणि त्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास झाली. डेंग्यू हा मच्छर पासून होणारा रोग आहे. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असते.

शहरातील अनेक भागात डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूची साथ कमी होण्याचे चिन्हे दिसत नाही. नालासोपारा येथील वसंत नगरी, एव्हरशाइन येथे सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत. एव्हरशाइन येथील तर प्रत्येक इमारतीत एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले आहे. वसईतील आनंदनगर, माणिकपूर येथेही डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळलेले आहेत. काही दिवसापूर्वीच डेंग्यूमुळे माणिकपूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. अनेक डेंग्यूग्रस्त नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र महापलिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जानेवारी ते सप्टेंबर २०१८ पर्यंत फक्त २१ रुग्णांना लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

एका महिलेचा डेंग्यूमुळे झालेला मृत्यू त्यामुळे शहरात खळबळ उडाली असतानाच महापालिकेलाही उशिराने जाग आली आहे. आरोग्य विभागाची डेंग्यू निर्मूलनासाठी विशेष बैठक पार पडली असून त्यामध्ये डेंग्यूच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी स्वच्छता आणि औषध फवारणी जनजागृती यांसारखी मोहीम अधिक तीव्र पणे राबवण्याच निर्णय घेण्यात आला. धूर फवारणी, औषध फवारणी, स्वच्छता, जनजागृती मोहीम अशा प्रकारची उपाययोजना करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र पालिकेने केलेली उपाययोजना कुचकामी ठरत असल्याने महापालिकेला डेंग्यू रोगावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याचे समोर आले आहे.

डेंग्यू आणि साथीच्या आजारांची भयानक साथ पसरलेली असताना लोकप्रतिनिधीही त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग हा मुळात ठेका पद्धतीवरील बीएएम डॉक्टरांवर चालतो. वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात ४५१ डॉक्टर आणि कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेकडे सध्या २ रुग्णालय, ३ माता बालसंगोपन केंद्रे, २१ नागरी आरोग्य केंद्र, ९ दवाखाने आहेत. सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय उपक्रम आरोग्य विभागाला राबवावे लागत आहेत.  राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामधून (एनयूएचएम) कर्मचारी आणि डॉक्टरची पदे भरली जाणार होती. मात्र ती भरती प्रक्रियाही रखडलेली आहे. शहरातील आजारांचा मुकाबला करण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभागही ठणठणीत असायला हवा, तरच हे संकट महापालिकेच्या आरोग्य विभागाला पेलावता येईल.