या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा मजली इमारतीच्या कामास महापालिकेची बांधकाम परवानगी

ठाणे पोलिसांच्या मुख्यालयालाही लाजवेल अशा पद्धतीचे सुसज्ज आणि सुविधायुक्त पोलीस ठाणे यंदाच्या वर्षी कळवेकरांच्या सेवेत सज्ज होणार असून तब्बल सहा मजली इमारतीच्या या पोलीस ठाण्याच्या कामास ठाणे महापालिकेने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या पोलीस ठाण्याच्या उभारणीस हिरवा कंदील दाखविला होता. या इमारतीचा पायाभरणी समारंभही उरकण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत हे काम रखडले होते. अखेर नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला शहरविकास विभागाने या कामास मंजुरी दिली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी या शहरांचा भार खांद्यावर पेलणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तालयाकडे पायाभूत सुविधांची वानवा असल्याची ओरड सातत्याने होत असते. झपाटय़ाने नागरीकरण होत असलेल्या या भागासाठी पोलीस दल मात्र अपुरे असून वाहतुकीचे नियोजनही अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरू असल्याची तक्रार सातत्याने पुढे येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात तब्बल ३३ पोलीस ठाणी असून अनेक इमारतींना डागडुजीची आवश्यकता आहे. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी तसेच कोर्टनाक्यालगत असलेल्या कळवा पोलीस ठाण्याचा कारभार पदपथांना लागून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या इमारतींमधून सुरू आहे. गेल्या काही वर्षांत कळवा-खारेगाव परिसराचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला असून येथील लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. असे असताना एखादी तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठण्यासाठी कळवा-खारेगावकरांना खाडी पूल ओलांडून ठाणे शहरात यावे लागते. पोलीस ठाण्याची इमारतच शहराबाहेर असल्याने कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन करताना कळवा पोलिसांची दमछाक होत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून  दिसत होते.

नव्या इमारतीचा बाज

तांत्रिकदृष्टय़ा कळवा शहराबाहेर असलेले पोलीस ठाणे शहरात आणले जावे यासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास प्रतिसाद देत तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने कळवा आणि खारेगाव या दोन्ही उपनगरांच्या मध्यभागी कळवा पोलीस ठाण्यासाठी जागा निश्चित केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते या इमारतीचा पायाभरणी समारंभही उरकण्यात आला. मात्र, स्थानिक नियोजन प्राधिकरण असलेल्या महापालिकेच्या शहरविकास विभागाची बांधकाम परवानगी नसल्याने इमारतीचे बांधकाम सुरू झाले नव्हते. अखेर वर्षअखेरीस शहरविकास विभागाने या बांधकामास हिरवा कंदील दाखविल्याने नव्या वर्षांत कळव्याची इमारत उभी रहाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार आव्हाड यांनी दिली.

सर्वात प्रशस्त पोलीस ठाणे

कळव्यातील सहा मजल्यांच्या पोलीस ठाण्यात दोन माळ्यांचे पोलीस ठाणे, एका मजल्यावर व्यायामशाळा, महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त विश्राम खोली, अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा, खारेगाव या पट्टय़ातील पोलीस उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याने या पोलीस ठाण्याचे महत्त्व वाढेल, असा दावा केला जात आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यापैकी हे सर्वात प्रशस्त आणि सुविधायुक्त ठाणे असेल, असा दावा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता ठाणे ’शी बोलताना केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The six storied building permit form the the municipal corporation to construction work for kalwa police
First published on: 06-01-2016 at 02:11 IST