निखिल मेस्त्री

२० विद्यार्थ्यांना खरूज झाल्याचे निष्पन्न; आश्रमशाळेतील पाणीपुरवठा, अन्य सुविधांबाबत तक्रारी

सफाळेपासून दहा किमी अंतरावर असलेल्या लालठाणे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्वचारोग होण्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत २० विद्यार्थ्यांना खरूज झाल्याचे उघड होत आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि खबरदारी न घेतली गेल्याने विद्यार्थ्यांना त्वचासंसर्ग होत असून आश्रमशाळेतील प्राथमिक सुविधांचा अभावही याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

पालघर-मनोर रस्त्यावरील चहाडे नाक्यापासून नऊ किमी अंतरावर लालठाणे ही शासकीय आश्रमशाळा आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवण्यात येणाऱ्या या आश्रमशाळेत पाचवी ते दहावी या इयत्तांमधील १६२ विद्यार्थी व १२४ विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यापैकी १४६ विद्यार्थी व १२४ विद्यार्थिनी आश्रमशाळेच्या वसतिगृहातच राहतात. काही दिवसांपूर्वी शाळेतील एका विद्यार्थ्यांला खरूज या त्वचारोगाची बाधा झाली होती. परंतु त्यानंतर काही दिवसांनी २० विद्यार्थ्यांनाही या रोगाने ग्रासले. या विद्यार्थ्यांवर सफाळे ग्रामीण रुग्णालयामार्फत गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू आहेत. मात्र उपचार सुरू असतानाही या ठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेची पुरेशी खबरदारी घेण्यात आलेली नाही. ‘विद्यार्थ्यांवर उपचार झाल्यानंतर त्यांना घरी पाठवावे, जेणेकरून हा आजार बरा होईल, असे आम्ही आश्रमशाळा प्रशासनास कळवले आहे,’ अशी माहिती सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद रणदिवे यांनी दिली. मात्र या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले नसल्याचे समजते. आश्रमशाळा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वसतिगृहातील अन्य विद्यार्थ्यांनाही या आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आश्रमशाळेची दुरवस्था

*  लालठाणे आश्रमशाळेतील गैरसोयी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरू लागल्या आहेत. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे स्नानगृह तसेच स्वच्छतागृह अतिशय घाणेरडय़ा अवस्थेत असल्याचे दिसून येते. येथील वर्गखोल्यांमध्येही प्रचंड अस्वच्छता दिसून येते.

*  विद्यार्थी ज्या वर्गात शिकतात, त्याच ठिकाणी त्यांचे सामान, वह्या-पुस्तके, अंथरूण ठेवण्यात आले आहे. वर्गातल्याच भिंतींवर दोऱ्या लावून त्यावर ओले कपडे वाळण्यास टाकले जातात. त्यामुळे वर्गखोल्यांमधील वातावरण अतिशय कुबट व कोंदट असल्याचे जाणवते.

*  या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. बोअरवेलमधून उपसण्यात येणारे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. स्नानासाठी गरम पाण्याचीही व्यवस्था नाही. विद्यार्थ्यांना बाराही महिने गार पाण्यानेच स्नान करावे लागते.