खासगी रुग्णालये, पॅथलॉजीला पालिका आयुक्तांचे आदेश

भिवंडी शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांच्या निर्मूलनासाठी भिवंडी महापालिकेने विशेष मोहीम राबविली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील खासगी रुग्णालये आणि पॅथलॉजी लॅबमध्ये संशयित रुग्ण आढळल्यास त्याची सूचना महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.

भिवंडी शहरात सध्या साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. शहरात मोठय़ा प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून स्वच्छतेविषयी माहिती देण्यात येत आहेत. तसेच जनजागृतीसाठी माहिती पत्रकेही वाटण्यात येत असल्याचे आष्टीकर म्हणाले. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत शहरात ठिक-ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनी घरात धुरीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. नगरसेवक  आणि समाजसेवी संघटना यांची मदत घेण्यात येत असल्याचेही आयुक्त आष्टीकर यांनी सांगितले.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

साथीचे आजार पसरल्याने वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचारी सर्व नागरिकांना ‘एक दिवस कोरडा’ पाळण्याचे आवाहन करीत आहेत. घरात जास्त दिवस पाणी साठवणुकीमुळे त्या पाण्यात डास अंडी घालतात. त्यामुळे साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. पाण्याने भरलेली सर्व भांडी एक दिवस रिकामी करण्यात यावीत आणि कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.