विरारमध्ये २० ऑगस्ट रोजी एका ११ वर्षीय चिमुकल्याने मोठय़ा धाडसाने एका चोराला पकडून दिले होते. या चोराकडून पोलिसांनी तपास करत १७ गुन्ह्यची उकल केली आहे. या चोरापासून जवळपास १० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.

विरार पश्चिमेला राहणाऱ्या तनीष महाडिक याने २० ऑगस्ट रोजी मोठे धाडस दाखवले होते, तनीष घरात एकटा असताना अचानक एक इसम सर्वेक्षण करण्याच्या बहाणे घरात घुसला होता. घरात शिरताच त्याने चाकू काढून तनीषला धमकावले आणि घरातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तनीषने प्रसंगावधान दाखवून प्रतिकार केला. नंतर शेजाऱ्यांच्या मदतीने या चोराला पकडण्यात आले. या धाडसाबद्दल पोलिसांनी तनीषचा गौरव केला होता.

तनीषने पकडून दिलेला चोर पोलिसांच्या तावडीत सापडल्याने पोलिसांनी तपास करत त्याच्याकडून १७ घरफोडीचे गुन्हे उघड केले. पोलिसांनी आरोपी अब्दुल गफार मन्सूर शेख याच्याकडून २५ तोळेसोने आणि ४५ ग्राम चांदीचे दागिने हस्तगत केले. या दागिन्यांची किंमत जवळपास १० लाख रुपये असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली. आरोपी शेख हा दिवसा आणि रात्रीसुद्धा घरफोडी करायचा. वेगवेगळे सोंग घेऊन तो चोरीचे गुन्हे करत असे. विशेष म्हणजे एकटाच असून त्याने एकटय़ानेच इतक्या चोऱ्या केल्या आहेत. विरार पूर्व-पश्चिम परिसरात त्याने हे गुन्हे केले आहेत.