कल्याण, डोंबिवलीतील कोणतीही निवडणूक असो एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. लोकसभा निवडणुकीत शिंदेपुत्राच्या विजयासाठी चव्हाण यांनी जिवाचे रान केले. विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांना पडद्यामागून मदत करत िशदे यांनी लोकसभा निवडणुकीतील मदतीचे पांग फेडल्याची चर्चा आहे. . युती व्हावी यासाठी आग्रही असलेल्या भाजपमधील तुरळक नेत्यांमध्ये चव्हाण अग्रभागी असल्याचे बोलले जाते. मात्र युती होण्याची शक्यता विरळ असल्याचे चित्र दिसू लागल्याने ही निवडणूक चव्हाण आणि शिंदे या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी चव्हाण भलतेच आग्रही दिसले. पक्ष श्रेष्ठींकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली असली तरी शिवसेनेचे त्यांचे सलोख्याचे संबंध पाहता ते प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कल्याणमध्ये भाजपची ताकद जेमतेम असल्याने या ठिकाणी भाजप अधिक जागा जिंकण्यासाठी कोणती व्यूहरचना आखते हेही महत्त्वाचे ठरणार आहे. युती तोडण्यात भाजपचे आमदार नरेंद्र पवार हेच खलनायक आहेत, अशा तक्रारी स्थानिक शिवसेना नेत्यांनी मातोश्रीवर केल्या आहेत. निवडणुकीत पवार यांना लक्ष्य करण्याचा सेनेचा मानस आहे. कल्याणमधील हॉटेलच्या बेकायदा बांधकामाला पाठीशी घातले म्हणून गणपत गायकवाड यांना लक्ष्य करण्यात येणार आहे. २७ गावांमध्ये संघर्ष समितीला हाताशी धरून भाजप शिवसेनेबरोबर दोन हात करणार आहे. त्यामुळे डोंबिवलीतील रणमैदानात शिंदे चव्हाण या दोन मराठा नेत्यांमधील संघर्षांकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.