वर्तकनगरमधील दोन इमारतींच्या प्रकारानंतर पालिकेचा अभियांत्रिकी विभाग संशयाच्या फेऱ्यात
सुमारे ७० लाख रुपयांचा दुरुस्ती खर्च करूनही वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील दोन इमारती अवघ्या वर्षभरात अतिधोकादायक ठरविण्यात आल्याने महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग आता चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. नव्या ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी ५४ आणि ५५ क्रमांकाच्या दोन इमारतींची प्लॉस्टर दुरुस्ती, संरचनात्मक परीक्षण, रंगरंगोटी तसेच वॉटरप्रूफिंग अशा स्वरूपाची कामे मार्च २०१५ मध्ये हाती घेण्यात आली होती. यासंबंधीच्या सविस्तर अंदाजपत्रकास आयुक्त संजीव जयस्वाल यांची मंजुरीही घेण्यात आली होती. असे असताना वर्षभरात या इमारती अतिधोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अभियांत्रिकी विभागातील सावळागोंधळ स्पष्ट झाला आहे.
ठाणे शहरातील अनेक इमारती धोकादायक ठरल्या असून पावसाळ्याच्या तोंडावर त्या रिकाम्या करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकतेच दिले आहेत. इमारत धोकादायक ठरविताना राज्य सरकारने काही निकष ठरवून दिले असून त्यानुसार अतिधोकादायक आणि दुरुस्ती आवश्यक अशा इमारतींची नवी यादी ठाणे महापालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. यानुसार ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये सुमारे ८० इमारती अतिधोकादायक, तर १७० इमारती दुरुस्तीसाठी तातडीने रिकाम्या कराव्या लागणार आहेत. यापैकी काही इमारती धोकादायक नसताना केवळ पुनर्विकासासाठी जमीन मालक आणि बिल्डर यांच्या दबावामुळे त्या धोकादायक ठरविल्या जात असल्याचे आरोप होत असताना वर्तकनगर म्हाडा येथील इमारतींचे प्रकरण अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अभियंत्यांवर शेकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
म्हाडा वसाहतीमधील इमारती सरसकट धोकादायक ठरविण्याऐवजी दुरुस्त होऊ शकतील अशा इमारतींची कामे महापालिकेमार्फत केली जावीत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मध्यंतरी पुढे आला. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागात नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या दोघा वरिष्ठ अभियंत्यांनी १८ फेब्रुवारी २०१५ रोजी वर्तकनगर म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक ५४ आणि ५५ च्या दुरुस्तीचे सविस्तर अंदाजपत्रक तयार केले. या इमारतीत १८० कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेत दुरुस्तीच्या कामावर सुमारे ७० लाखांचा खर्च करण्यात आला. नवे प्लॅस्टर, रंगरंगोटी, वॉटरप्रूफिंगची कामे ठेकेदारामार्फत करून घेण्यात आली. असे असताना अवघ्या वर्षभरात या इमारती अतिधोकादायक कशा ठरल्या, असा सवाल आता उपस्थित होत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडेही या प्रकरणी तक्रारींचा पाऊस पडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या इमारतींची दुरुस्ती झाली तेव्हा जयस्वाल हेच महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. यासंबंधी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते अभ्यास दौऱ्यानिमित्त परदेशात असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
या प्रकरणी मुख्य अभियंता रतन अवसरमल यांच्याशी संपर्क साधला असता हा विषय कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा इमारतींच्या दुरुस्तीवर खर्च झाला आहे किंवा नाही मला सांगता येणार नाही असे ते म्हणाले. कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी आपण म्हाडा इमारती रिकाम्या करावयास निघालो आहोत असे सांगून नंतर बोलतो, असे स्पष्ट केले.

रहिवाशांना तीन दिवसांचा दिलासा
ठाणे : ठाणे येथील वर्तकनगर भागातील म्हाडा वसाहतीत धोकादायक ठरविण्यात आलेली इमारत क्रमांक ५४ आणि ५५ मधील रहिवाशांना सोमवारी दुपारी महापालिका प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करत घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही इमारत धडधाकट असल्याचा दावा करत रहिवाशांनी घरे सोडण्यास नकार दिला. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण काही काळ तंग बनले होते. या प्रकरणी काही रहिवाशांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी महापालिकेच्या कारवाईस तीन दिवसांची स्थगिती दिली. तसेच इमारतीची पाणी आणि विजेची जोडणी तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रहिवासी आणि महापालिका अधिकाऱ्यांमधील संघर्ष तूर्तास लांबला आहे.
वर्तकनगर भागातील म्हाडा वसाहतमधील ५४ आणि ५५ या दोन्ही इमारती धोकादायक म्हणून महापालिका प्रशासनाने घोषित केल्या आहेत. तसेच इमारतीमधील घरे रिकामे करण्याची नोटीसही रहिवाशांना पालिकेने दिल्या होत्या. मात्र, पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बिल्डरच्या दबावामुळे इमारती रिकाम्या केल्या जात असल्याचा आरोप करत रहिवासी संघर्षांच्या पवित्र्यात आले असून महापालिका प्रशासन त्यामुळे अडचणीत सापडले आहे. शनिवारी सकाळी महापालिकेचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी गेले असता त्यांना रहिवाशांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कारवाईविनाच पथकाला माघारी परतावे लागले होते. सोमवारी सकाळी महापालिकेचे पथक पुन्हा कारवाईसाठी येणार असल्याची माहिती रहिवाशांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासूनच रहिवासी इमारतीच्या खाली ठिय्या मांडून बसले होते. तसेच महापालिकेविरोधात रहिवाशांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने रहिवाशांच्या शिष्टमंडळासोबत एक तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दोस्तीच्या भाडेतत्त्वावरील दोन घरे एका कुटुंबाला देण्याचे प्रशासनाने मान्य केले. जोपर्यंत करार होत नाही, तोपर्यंत घरे रिकामी केली जाणार नाहीत, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. त्यामुळे या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. या प्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयामध्ये दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी एका याचिकेवर सोमवारी दुपारी सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर इमारतीमधील रहिवासी घराला कुलूप लावून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले. त्याचवेळी महापालिका प्रशासनाने इमारतीचा ताबा घेऊन घरे रिकामे करण्याचे काम सुरू केले. इमारतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची घरे रिकामी करण्यात आली.