उर्वरित मार्गिकांची कामेही लवकरच

कल्याण  : वाहतूक कोंडीचे जंक्शन म्हणून दुर्गाडी चौकाची ओळख आहे. या  ठिकाणी मागील पाच वर्षांपासून उल्हास खाडीवर नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू होते. या सहा मार्गिका असलेल्या पुलाच्या दोन मार्गिका येत्या जूनपासून सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह सुटण्यास मदत होणार आहे. या पुलाच्या उर्वरित चार मार्गिका लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड भागातील बहुतांशी वाहतूक मुंबई, भिवंडीकडे जाण्यासाठी कल्याण शहरातून जाते. कल्याणमधून दुर्गाडी किल्ला येथून भिवंडीकडे जाण्यासाठी जुना अरुंद पूल आहे. या पुलामुळे या भागात सतत वाहनकोंडी होत होती. याच भागात ब्रिटिशकालीन उड्डाणपूल आहे. तो कमकुवत झाल्याने मागील अनेक वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या कमकुवत पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल उभारण्यात आला. हा पूलही वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी दिशेने कल्याणमध्ये येणारी आणि जाणारी वाहने दुर्गाडी पुलाचा वापर करतात. या पुलावरून सकाळ, संध्याकाळ ये-जा करताना वाहन चालकांना एक ते दीड तास पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून राहावे लागते. एवढी कोंडी या भागात होत असते. नोकरदार वर्गाचे यामध्ये सर्वाधिक हाल होतात. वाहतूक पोलिसांचा दुर्गाडी चौकात कायमस्वरूपी ताफा असूनही वाढत्या वाहनांचा लोंढा थोपविताना दमछाक होत असते. या भागातील वाढती वाहनसंख्या आणि कोंडीचा विचार करून पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दुर्गाडी पुलावर आणखी एक नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. या पुलाचे काम सुप्रीम इन्फ्रा कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने दीड ते दोन वर्षे संथगतीने काम केले. त्यानंतर पुलाचे काम बंद पडले. पुलाचे काम ११० कोटी रुपये खर्चाचे ठरविण्यात आले होते. सुप्रीम कंपनीने खाडीतील खांब उभारणीचे काम केले होते. हे काम लवकर पूर्ण करावे म्हणून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्राधिकरणाने ठेकेदारामागे तगादा लावला होता. ठेकेदाराला कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. हे काम सुप्रीम कंपनीकडून वेळेत पूर्ण होणे शक्य नसल्याने प्राधिकरणाने या कंपनीचा ठेका रद्द करून दोन वर्षांपूर्वी हे काम मे. तांदळकर आणि थोरात बांधकाम कंपनीला देण्याचा निर्णय घेतला.

या कंपनीने महाडजवळील सावित्री नदीवरील उड्डाणपूल विहित वेळेच्या आत बांधून पूर्ण केला. या कंपनीने दुर्गाडी पुलाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. सहा पदरांपैकी दोन पदराचा पूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. उर्वरित दोन पदरांची कामे सुरू आहेत. ती कामे पूर्ण होईपर्यंत दुर्गाडी पुलाजवळील वाहतूक कोंडीचा विचार करून नवीन पुलाचे दोन पदर सुरू करून या भागातील वाहतूक कोंडीला पूर्ण विराम देण्याची वाहतूक विभागाची मागणी आहे. या मागणीचा विचार करून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून बांधून सज्ज असलेल्या दोन मार्गिका येत्या जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील दोन आणि नवीन पुलावरील दोन मार्गिका सुरू झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांमधील अडथळा दूर होईल. सध्या एकाच पुलावरून ये-जा करणारी वाहने धावतात. नवीन पुलाचे उर्वरित दोन पदर सुरू झाले की सहा पदरातून दुर्गाडीजवळील पुलावरून वाहने धावतील, असे महानगर प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.