कंट्रोल लिस्ट’ न तपासताच याद्या प्रसिद्ध केल्याची भीती

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत अभूतपूर्व गोंधळ घालण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी हा गोंधळ मोठय़ा प्रमाणात दिसण्याची शक्यता राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक मतदारांची नावे राहत्या प्रभागांमधून अन्य प्रभागांमध्ये वळती करण्यात आल्याने मतदारांसह, उमेदवार हैराण झाले आहेत. पालिका निवडणूक अधिकाऱ्यांमुळे हा गोंधळ उडाल्याची टीका राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

अन्य प्रभागात मते कशी स्थलांतरित केली, अशा प्रकारच्या हरकती अनेक नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे घेतल्या आहेत. अशा हरकतींना अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवत त्यांचे म्हणणे न ऐकता मतदार याद्या अंतिम करण्याकडे प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. ‘महा ऑनलाइन’ ही एजन्सी पालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे निवडणूकविषयक काम पाहत आहे. पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सुरू करण्यात आले. मतदार याद्या महा ऑनलाइनकडून घ्या, असे आयोगाने पालिका अधिकाऱ्यांना कळविले होते. सुरुवातीच्या काळात निवडणूक अधिकारी असलेल्या एका उपायुक्ताने या याद्या घेण्यास टाळाटाळ केली. त्यांच्या आदेशावरून विधानसभेच्या मतदार यादीप्रमाणे याद्या तयार करण्याचे काम सुरू केले. निवडणूक आयोगाकडून दबाव आल्यावर महा ऑनलाइनकडून पालिकेने मतदार याद्या घेतल्या.

त्यांच्यात घोळ करण्याच्या कामास सुरुवात झाली. काही वजनदार नगरसेवकांनी या मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्यात हातभार लावला. नावे अन्य प्रभागात वळती करण्यात आल्याची, इमारतींची नावे काढून टाकल्याच्या तक्रारींचा ओघ पालिकेत वाढू लागला. काही तक्रारींची शहानिशा करून नावे पुन्हा त्याच प्रभागात आणण्याचे प्रयत्न झाले. मतदार याद्यांमधील नावांचा गोंधळ संपविण्यासाठी उपायुक्त सुरेश पवार यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांनी याद्यांमधील नावाच्या गोंधळाच्या ‘कंट्रोल लिस्ट’(समतल याद्या) तयार केल्या. या कंट्रोल लिस्ट महा ऑनलाइनकडे पाठवून त्यांची दुरुस्ती करून मग महा ऑनलाइनने मतदार याद्या अंतिमत: प्रसिद्ध करणे आवश्यक होते. कंट्रोल लिस्ट महा ऑनलाइनकडे दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी महा ऑनलाइनने सुधारित याद्या प्रसिद्ध केल्या. एवढय़ा वेगाने महा ऑनलाइनने काम केलेच कसे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंट्रोल लिस्टची सत्यता न पडताळता मतदार याद्या प्रसिद्ध केल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे शोधताना मोठा गोंधळ उडणार असल्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. पालिकेचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील, संजय जाधव यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते बैठकीत व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.