ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली असून त्यामुळे आठवडय़ाला ६० तासांच्या पाणीकपातीचे संकट शहरवासीयांवर कोसळले आहे. त्याचबरोबर या नदीपात्रातील पाण्याची गुणवत्ताही घसरून पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्यावर जलपर्णीने आपले जाळे टाकले असून ही वनस्पती पाणी शोषून घेत आहे. मात्र याकडे ठाण्यातील विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांनी मात्र त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरवासीयांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या भागांना पाणीपुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम आणि कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदीतून पाणी उचलतात. लाखो लिटर पाण्याचा उपसा या नदीतून होत असताना त्याच्या स्वच्छतेसाठी किंवा परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या प्राधिकरणांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. परिसरातील कारखान्यांमधून नदीत सांडपाणी सोडले जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच या नदीच्या पाण्यावर जलपर्णीचे दाट थर जमा झाले आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यासोबतच त्याची पातळीही खालावत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हेच प्रदूषित पाणी आसपासच्या शहरांतील नागरिकांना पुरवले जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मोहने परिसरामध्ये जलपर्णीच्या थरामुळे जलस्रोतांचा विनाश होत आहे.

मासेमारी संपुष्टात
उल्हास नदीत पूर्वी ठिकठिकाणी मासेमारी होत होती. आता हा उद्योग जवळपास संपुष्टात आला आहे. काही ठिकाणी अजूनही मासेमारी होते. मात्र त्या माशांना उग्र दर्प येतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली. जलचर हे पाण्याचा प्रवाह शुद्ध आणि संरक्षित असल्याची एक ठळक खूण आहे. पुढे कल्याण आणि ठाणे खाडीतील जलजीवन यापूर्वीच पूर्णपणे नष्ट झालेले आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर उल्हास नदीतील जलचरांचेही अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

पुराचा धोका

सह्य़ाद्रीच्या ज्या प्रदेशात उल्हास नदी उगम पावते, तो अतिपर्जन्यशील भाग आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नदीचे पात्र बऱ्याच प्रमाणात कोरडे दिसत असले तरी पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहत असते. पूर्वी नदीकिनारी फारशी मानवी वस्ती नसल्याने पुराचा फारसा धोका नव्हता. २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीत मात्र उल्हास नदीने रौद्र रूप धारण करून परिसरात प्रचंड नुकसान केले होते. मात्र त्या अनुभवाने कोणताही धडा न शिकता नदीपात्रालगत बांधकामे सुरूच आहेत. परिणामी पुराचा धोका वाढला आहे.