ठाणे, कल्याण, डोंबिवली ही कला रसिकांची शहरे. या शहरांमध्ये कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून नाटय़-कला मंदिरे उभारली गेली. मात्र आज त्यांची अवस्था बिकट बनली आहे. काही नाटय़मंदिरांचा खर्च पालिकांना परवडत नाही तर काहींना नाटकाचा खेळ परवडत नाही. यामुळे नाटय़रसिकांनीही पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.

घटत्या प्रेक्षकसंख्येचा घोर!

nashik live stock purchase marathi news
नाशिक: लाभार्थ्यांची जनावर खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

गडकरी रंगायतन, ठाणे</strong>

भाग्यश्री प्रधान

ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेले गडकरी रंगायतन हे नाटय़गृह ठाणे शहराचा सांस्कृतिक चेहरा आहे. पूर्वीपासूनच ठाणे शहर रसिक प्रेक्षकांची संख्या अधिक होती, त्यामुळे एम. एच. हायस्कूल येथे संगीत नाटक होत. त्यानंतर साधारण १९८० साली गडकरी रंगायतनची स्थापना झाली. गेली ३०-३५ वर्षे अविरतपणे ठाणे रसिकांना मनोरंजनाची सेवा गडकरी रंगायतन देत आहे. पूर्वी ३० रुपयांतही प्रेक्षकांनी नाटक बघायला मिळत होते. त्यानंतर महागाई वाढत गेली त्याप्रमाणे तिकिटांची किंमतही वाढली. प्रेक्षकांची संख्या रोडावली. अशातच नाटक निर्मात्यांनी गडकरी रंगायतन येथील बाल्कनी सध्या बंद केली आहे. तसेच येथे म्युझिक सिस्टीमही खराब असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. खुच्र्याची स्थिती चांगली असली तरीदेखील नाटय़गृहात खाऊ आणण्याच्या प्रेक्षकांच्या सवयीमुळे त्या हळूहळू खराब होऊ लागल्या आहेत.

गडकरी रंगायतन या ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नाटय़गृहात प्रेक्षकांना बाल्कनीची तिकिटे देण्याचे नाकारले जात आहे. प्रेक्षक संख्या कमी झाल्याने हे पाऊल उचलले असल्याचे कारण निर्मात्यांकडून दिले जाते. मात्र गडकरी रंगायतन जरी भाडय़ाने दिले जात असले तरी येथील आसन व्यवस्थेवर महापालिकेचे नियंत्रण असावे, अशी नाटय़रसिकांची अपेक्षा आहे. काही नाटकांचे निर्माते बाल्कनीच्या आसन व्यवस्थेचा तक्ता बुकिंग कार्यालयात ठेवत नाहीत. याबाबत गडकरी रंगायतनच्या बुकिंग कार्यालयात चौकशी केली असता, बाल्कनी वापरायची की नाही हा निर्णय त्या त्या नाटकाच्या निर्मात्यांचा असतो असे त्यांनी सांगितले. बाल्कनीसह वापरण्यात येणाऱ्या प्रेक्षागृहाच्या भाडय़ात कोणताही फरक नसल्याचेही सांगण्यात आले. महापालिकेतर्फे बाल्कनी बंद केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर निर्मात्यांकडून प्रमुख प्रेक्षागृहातील खुच्र्यापैकी शेवटच्या एका रांगेचे तिकीट बाल्कनीच्या तिकीटदराएवढेच असल्याचे सांगण्यात आले आहे. बाल्कनीचे तिकीट हे ५० रुपये इतके अल्प आहे. यामुळे इतक्या कमी पैशात नाटक बघणे हे त्या नाटकाचा अपमान आहे. नाटकाचा खर्चही त्यामानाने अधिक असतो. त्यामुळे निर्मात्यांनाही ते परवडत नाही. बाल्कनीचे तिकीट घेऊन टवाळखोरी करणारे, दारू पिणारे, गोंधळ घालणारे प्रेक्षक अधिक असतात. त्यामुळे स्टॉलमध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांना याचा अधिक त्रास होतो, असे  निर्मात्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘महापालिकेने कोणत्याही प्रकारे बाल्कनी बंद केलेली नाही. जर प्रेक्षकांनी बाल्कनीचे तिकीट मागितले तर त्यांना ते देणे आवश्यक आहे. जर निर्माते ही तिकिटे विक्रीसाठी ठेवत नसल्यास यात महापालिका नक्कीच हस्तक्षेप करेल,’ असे महापालिका जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी म्हटले आहे.

डोईजड झालेला पांढरा हत्ती

आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण</strong>

भगवान मंडलिक

कल्याणमधील रसिक प्रेक्षकासाठी पंधरा वर्षांपूर्वी कल्याण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आचार्य अत्रे नाटय़गृहाची उभारणी करण्यात आली. शहरात नवीन असलेल्या अत्रे रंगमंदिरात कार्यक्रमांची एवढी रेलचेल असायची की, कार्यक्रमासाठी तारखा मिळणेही अवघड होते. विशेष म्हणजे डोंबिवलीत नाटय़गृह नसल्याने तेथील नाटय़प्रेमी आवर्जून कल्याण येथे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी येत होता. डोंबिवलीत सावित्रीबाई नाटय़गृहाची उभारणी झाली आणि कल्याणकडे येणारा प्रेक्षकांचा ओघ घटला.

अत्रे रंगमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम तुरळक होतात. शनिवार, रविवारच्या दिवशी नाटय़गृह तेवढे हाऊसफुल्ल झाले तर ठीक. उर्वरित दिवशी व्यवस्थापनाला कार्यक्रमाची वाट पाहावी लागते अशी सध्याची परिस्थिती आहे. कार्यक्रम नाही म्हणून उत्पन्न नाही. उत्पन्न नाही म्हणजे नाटय़गृहात सुधारणा करताना प्रशासनाकडून हात आखडता.  अत्रे रंगमंदिरासाठी गेल्या पाच वर्षांत दीड कोटीपासून ते दोन कोटींपर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात निधी राखून ठेवण्यात येतो. या खर्च होणाऱ्या निधीपेक्षा महसुलाची रक्कम कमी असते. दर वर्षी रंगमंदिराच्या माध्यमातून प्रशासनाला दहा ते पंधरा लाखांचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळेच या वेळी प्रशासनाने नाटय़गृहांचे खासगीकरण करून ते चालविण्यास देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

ठरावीक ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी यांचे अत्रे रंगमंदिर हे एक स्वतंत्र दुकान आहे. या दुकानातील भानगडी बाहेर पडणार नाहीत याची योग्य खबरदारी ते घेत असतात. त्यामुळे अत्रे रंगमंदिरातील आसनव्यवस्था, नाटय़गृहात कोणत्या त्रुटी आहेत हे प्रशासनाला लवकर कळत नाही. जेव्हा रसिक प्रेक्षक, नाटय़ निर्माता ओरडायला लागतो, त्या वेळी मग प्रशासनाला या त्रुटींची जाणीव होते. तेवढय़ा वेळेपुरती डागडुजी केली जाते. पुन्हा येरे माझ्या मागल्या. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, असे अधिकारी, कर्मचारी जर नाटय़गृहांचे काम पाहत असतील नाटय़गृहात कशाला होतील सुधारणा. अत्रे रंगमंदिर म्हणजे प्रशासनाच्या नजरेत पांढरा हत्ती झाला आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर, नाटय़गृहांचे खासगीकरण हा एकमेव उपाय आहे.

कलेकलेने वाताहत

सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली

शर्मिला वाळुंज

डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत रसिकांसाठी सावित्रीबाई फुले कलामंदिर उभारण्यात आले. मात्र अवघ्या तीन-चार वर्षांत या कलामंदिराची पुरती दुर्दशा उडाली. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा कलामंदिराचा पालिका प्रशासनाला योग्य वापर करता आला नसल्याने सध्या हे कलामंदिर तोटय़ात आहे. त्याच्या दुरुस्तीचा खर्चही पालिकेला परवडत नसल्याने अनेक असुविधांचा सामना रसिकांना करावा लागतो. कलादालनाची दुरुस्ती करण्यात आली असली तरी त्याची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता नीट राखली जात नाही, यामुळे या कलादालनात उंदरांचा सुळसुळाट पुन्हा एकदा वाढला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००७ साली साडेसोळा कोटी रुपये खर्च करून कलाप्रेमींसाठी सावित्रीबाई फुले कलामंदिराची उभारणी केली. कल्याण व डोंबिवली शहराला जोडणाऱ्या ठाकुर्लीजवळ हे कलामंदिर आज उभे आहे. वातानुकूलित ९८४ प्रेक्षक क्षमतेचे मुख्य प्रेक्षागृह, अ‍ॅकॉस्टिक्स, उत्कृष्ट प्रकाशयोजना व अंतर्गत सजावट, नाटय़गृहासाठी आवश्यक ग्रीन रुम्स, सराव कक्ष, आराम कक्ष, क्राय खोली, पॅनल रूम यांची बांधणी उत्कृष्टरीत्या करण्यात आली आहे. कलाप्रेमी व कलाकारांकडून मुंबईतही अशा प्रकारचे नाटय़गृह कुठे नसल्याची पोचपावती या कलामंदिराला मिळाली होती. परंतु त्याची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती पालिकेला करता आली नाही. कलामंदिर देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदारांना दिल्यामुळे या ठेकेदारांनी हवे तसे लक्ष येथे दिले नाही. त्यामुळे कलामंदिराचा कारभार सगळा रामभरोसे झाला. काही वर्षांतच कलामंदिराचे छत गळायला लागले, कारपेट फाटले, कलादालनातील भिंती पावसाळ्यात खराब झाल्या. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली. हे सर्व पाहता सत्ताधारी पक्षाने नाटय़ करीत कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश काढले. त्यानुसार २०१४ साली कलादालनातील खुच्र्या, कारपेट, तसेच कलादालनाची डागडुजी करण्यात आली. मात्र त्यांची योग्य देखभाल दुरुस्ती नसल्याने येथील काही खुच्र्या मोडल्या होत्या. त्या त्वरित दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शालेय कार्यक्रमांसाठी हे कलादालन दिले जात असल्याने शाळकरी मुले खुच्र्याची मोडतोड करतात. तसेच कलादालनात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई असतानाही डोअर कीपरची येथे व्यवस्था नसल्याने रसिक श्रोते अथवा मुले खाद्यपदार्थ आत नेतात त्यामुळे येथे पुन्हा एकदा उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे.

विद्युत विभाग वगळता कॅन्टीन, डोअर कीपर, स्वच्छता आदींच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कलामंदिराची स्वच्छता, देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नाही. एक कोटीची तरतूद कलामंदिरासाठी पालिका अर्थसंकल्पात करते. त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च दहा ते बारा लाखाच्या वर जातो. कल्याण-डोंबिवली या महापालिका क्षेत्रात दोन नाटय़गृहे उभारण्याची आवश्यकताच मुळात नव्हती. परंतु डोंबिवलीत कलारसिक  मोठय़ा प्रमाणात असल्याने या कलामंदिराची उभारणी पालिकेने केली. परंतु ती शहराच्या एका टोकाला केल्याने तेथे जाणे नागरिकांना अडचणीचे ठरू लागले.

मुळात हे नाटय़गृह नसून कलामंदिर आहे, येथे सर्व व्यावसायिक नाटकांसोबतच वाद्यवृंद कार्यक्रम, शालेय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमही घेतले जातात. यामुळे सुरुवातीला नाटय़गृहातून उत्पन्न तरी पालिकेला मिळत होते. परंतु लग्नसमारंभाने नाटय़गृहाची दुरवस्था झाल्याने लग्नसमारंभासाठी नाटय़गृह देणे पालिकेने बंद केले. त्यानंतर केवळ सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, शालेय कार्यक्रम व नाटकांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या कलामंदिराची भिस्त अवलंबून आहे. लग्नकार्यातून ८० लाख ते १ कोटी उत्पन्न पालिकेला मिळत होते. परंतु ते आता बंद झाल्याने ४० ते ५० लाखाच्या घरात उत्पन्न आले आहे.

नाटय़प्रयोगांची जाहिरात योग्य पद्धतीने होत नसल्याने नाटय़कलाकार येथे प्रयोग करण्यासाठी अनेकदा नकार देतात. नाटय़प्रयोगांची तिकीट विक्री व्हावी, नाटकांची माहिती रसिकांना मिळावी यासाठी डोंबिवली पालिका विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली. परंतु नाटकांची जाहिरात होत नाही. फलक लावले जात नाहीत अशी ओरड होत आहे.

बांधकामाचे ‘नाटक’

डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे

नीलेश पानमंद

नव्या ठाण्याला सांस्कृतिक कोंदण लाभावे यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी खासगी विकासकाकडून भूखंडांच्या माध्यमातून उभारून घेतलेले डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या सदोष बांधणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील एका बडय़ा विकासकाकडून मोफत काही तरी उभारून घेतल्याबद्दल तत्कालीन आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी स्वतची पाठ थोपवून घेतली होती. महापालिकेच्या तिजोरीवर कशाचाही भार न टाकता असे काही तरी उभे राहात असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. मात्र नाटय़गृहासारख्या वास्तूची उभारणी होत असताना तिच्या बांधकाम दर्जाविषयी प्रश्नचिन्हे उभी राहू नयेत अशी किमान अपेक्षा असते. या अपेक्षांना सुरुंग लागल्याचे चित्र नुकतेच पाहायला मिळाले.

घोडबंदर भागातील सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातील मुख्य सभागृहाच्या छताचे प्लॉस्टर (पीओपी) कोसळल्यामुळे तीन दिवसांपूर्वी खळबळ उडाली. चार ते पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या नाटय़गृहाच्या दुरवस्थेबाबत विविध संस्थांकडून वर्षभरापासूनच तक्रारींचा ओघ सातत्याने सुरू होता. यासंबंधी नाटय़गृह व्यवस्थापनाने वर्षभरापूर्वी प्रभाग समितीमधील संबंधित कार्यकारी अभियंत्यांना पत्रही पाठविले होते. नाटय़गृहातील मूळ सभागृह नव्हे तर इतर ठिकाणी असलेल्या छताच्या दर्जाविषयी यामध्ये प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आली होती. मात्र या पत्राकडे कानाडोळा करण्यात आला आहे.

सुरुवातीला नामांतरावरून वाद रंगला होता आणि आता बांधकाम वादग्रस्त ठरले आहे. मागील वर्षभरापासून तिसऱ्या मजल्यावरील व्यासपीठाच्या छताच्या भिंतीतून पाणी गळती होत होती. वातानुकूलित खोली आणि गॅलरीच्या काचेमधूनही पाणी गळती होत होती. या पाश्र्वभूमीवर व्यवस्थापनाने प्रभाग समितीमधील कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले होते, मात्र त्या पत्राची कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्घाटनाचा सोहळा घाईघाईने उरकल्यामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चाही रंगली आहे. तसेच सुशोभीकरणाचे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचीही चर्चा आहे.

राजकारण्यांच्याच कार्यक्रमांना प्राधान्य

घोडबंदर भागातील नाटय़रसिकांना ठाणे शहरातील गडकरी रंगायतनमध्ये नाटक पाहण्यासाठी यावे लागत होते. त्यामुळे घोडबंदर भागात डॉ. घाणेकर नाटय़गृह उभारण्यात आले. या नाटय़गृहाच्या माध्यमातून नाटय़रसिकांची भूक भागेल अशी शक्यता होती, मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनेकदा नाटकांचे प्रयोग रद्द केले जातात, अशी ओरड आता नाटय़ निर्मात्यांकडूनही केली जात आहे.

नाटय़गृहातील सुविधा

  • घोडबंदर भागात टीडीआरच्या माध्यमातून डॉ. घाणेकर नाटय़गृह चार वर्षांपूर्वी उभारण्यात आले.
  • तळ अधिक तीन मजली नाटय़गृहाच्या मुख्य सभागृहातील आसनक्षमता ११९५ इतकी आहे.
  • तर मिनी थिएटरची आसनक्षमता १८२ इतकी आहे.

* याशिवाय, व्हीआयपी रूम, कॉन्फरन्स रूम, गेस्ट रूम, मेकअप रूम अशा अनेक सुविधा नाटय़गृहात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.