वऱ्हाडी बनून आलेल्या चोरटय़ांकडून पाच लाखांचे दागिने लंपास

ठाणे : लग्न सराईचा हंगाम सुरू होऊ लागताच या समारंभांमध्ये दागिने तसेच रोकड लंपास करणारी टोळी ठाणे शहरात सक्रिय झाली आहे. शहरातील दोन मोठय़ा हॉटेलांमध्ये आयोजित लग्नसमारंभांमध्ये एकाच दिवशी दोन चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. वऱ्हाडी बनून आलेल्या चोरटय़ांनी पाच लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. ठाणे पोलिसांनी या दोन्ही घटनांचा तपास सुरू केला असून सभागृहांच्या व्यवस्थापनांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुलुंड येथील अंबेसागर भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीचा लग्नसमारंभ तीनहातनाका येथील एलबीएस मार्गावरील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. दुपारी ३ वाजता वधूकडील वऱ्हाडी मंडळी या हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यावेळी वधूच्या आईच्या हातामध्ये ४ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांनी भरलेली एक बॅग होती. सायंकाळी लग्न सोहळा पार पडल्यानंतर छायाचित्र काढण्यासाठी वधूच्या आईने हातातील बॅग तेथील एका सोफ्यावर ठेवली असता वऱ्हाडी बनून आलेल्या चोराने ती उचलून पोबारा केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना घोडबंदर येथे घडली. घोडबंदर येथील ओवळा परिसरात एका हॉटेलमध्ये साखरपुडय़ाचा समारंभ आयोजित केला होता. या समारंभात वर-वधूकडील जवळचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी वराच्या भावाकडे ४४ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग होती. ही बॅग त्यांनी खुर्चीवर ठेवली असता दोन चोरटय़ांनी ती बॅग चोरली. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.