शिवसेना नेत्यांकडून ठेकेदार नितीन देसाईंबरोबर नवरात्रोत्सवाची पाहणी

थीम पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून चौकशी समिती नेमण्यात आली असतानाच या कामाचे ठेकेदार नितीन चंद्रकांत देसाई हेच सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांसह नवरात्रोत्सवाच्या कामाची पाहणी करीत असल्याची छायाचित्रे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उघड केली आहेत. थीम पार्कची चौकशी हा निव्वळ फार्स असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

थीम पार्क चौकशीचा ठराव करण्यास सत्ताधाऱ्यांना प्रचंड वेळ लागला. ठराव शनिवारी सायंकाळी उशिरा पाठविल्यामुळे त्यावर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत. त्याचाच बागुलबुवा उभा करण्याचे काम शिवसेना करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांमुळे सत्ताधारी शिवसेना पेचात सापडली असून चौकशी समितीबाबत संशयाचे धुके दाट झाले आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घोडबंदर येथील ‘जुने ठाणे, नवे ठाणे’ या थीम पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कामाचे आकडे फुगविल्याचे पुरावे सादर केले होते. त्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४८ तासांत समिती नेमण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही समिती नेमली नसल्यामुळे शिवसेनेची घोषणा हवेत विरल्याची चर्चा होती. चौकशी समितीच्या ठरावावर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांची स्वाक्षरी झाली नसल्याचा दावा सेनेने केला होता. मात्र हा दावा चुकीचा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

‘थीम पार्कच्या चौकशीत गौडबंगाल?’ असे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले होते. विरोधी पक्षनेते पाटील यांच्या आरोपांमुळे या वृत्तास दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेला या कामाच्या चौकशीची गरज नाही. या प्रकरणाची चौकशी झाली तर त्यामध्ये सत्ताधारीच अडकण्याची शक्यता आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.