भाजपचे आमदार संजय केळकर यांचा आरोप; ‘आर्थिक गुन्हे अन्वेषण’कडे तक्रार करणार घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या ‘थीम पार्क’च्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असतानाही या कामासाठी महापालिकेने १६ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे नंदलालपेक्षाही हा मोठा घोटाळा असून ‘थीम पार्क’च्या कामात ८२ टक्के भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सोमवारी केला. या कामाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करणार असून त्याचबरोबर या प्रकरणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ‘थीम पार्क’च्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा महापालिकेतील कारभारावर बोट ठेवून चौकशीची मागणी करीत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या ‘थीम पार्क’च्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून या कामाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, ही समिती स्थापण्याआधीच राष्ट्रवादी, भाजपविरुद्घ शिवसेना अशा वादाला तोंड फुटल्याचे चित्र आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची ‘थीम पार्क’ कामाचे ठेकेदार नितीन देसाई यांनी भेट घेतल्याचे प्रकरण पुढे आले होते. याच मुद्दय़ावरून भाजपने शिवसेना आणि आयुक्तांवर निशाणा साधला असतानाच आता ‘थीम पार्क’चा घोटाळा नंदलालपेक्षाही मोठा असल्याचा आरोप केला आहे. ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर, गटनेते नारायण पवार, नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, दीपा गावंड, स्नेहा आंब्रे, प्रतिभा मढवी आणि नम्रता कोळी यांनी सोमवारी सकाळी थीम पार्कच्या कामाचा पाहणी दौरा केला. पालिकेने उभारलेल्या ‘थीम पार्क’च्या निर्मितीसाठी किती खर्च येऊ शकतो, याचा अंदाज खर्च घेण्यासाठी भाजपने दोन ठेकेदारांकडून दरपत्रके मागविली होती. या दरपत्रकानुसार उभारणीसाठी अडीच कोटी रुपयांपेक्षाही कमी खर्च येत असल्याचे समोर आले आहे. सोमवारच्या दौऱ्यात ही दरपत्रके भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकारांसमोर सादर केली. हाच धागा पकडून ‘थीम पार्क’च्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असतानाही या कामासाठी पालिकेने १६ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, ‘थीम पार्क’च्या कामात ८२ टक्के भ्रष्टाचार झाल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. वीज पुरवठाही खंडित ‘थीम पार्क’मध्ये बसविण्यात आलेले विद्युत मीटरचे देयक भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने तीन ते चार महिन्यांपूर्वी पार्कचा विद्युत पुरवठा खंडित केल्याची बाब दौऱ्यादरम्यान समोर आली. ‘भेटणे योग्य नव्हते’ थीम पार्कच्या कामाची चौकशी सुरू असताना संबंधित ठेकेदाराची पालकमंत्री, कोणत्याही नेता किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेणे योग्य नसल्याचे मत केळकर यांनी दौऱ्यादरम्यान व्यक्त केले. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पालिकेतील ४२ टक्क्यांचा नंदलाल घोटाळा बाहेर काढला होता.