कृषी विभागाचे स्पष्टीकरण

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर: करोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी वाढवली आहे. त्याचा खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत कोणताही अडथळा येणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख पिके असलेल्या भातशेती आणि फळबागांच्या लागवडीसाठी कृषी विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. बी-बियाणे, खतांच्या मागणीची नोंद सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने ३ मेपर्यंत देशात टाळेबंदी वाढवली आहे. या टाळेबंदीमुळे शेतीच्या कामांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने पावले उचलली आहेत. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे खरीप हंगामाची तयारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी विभागाने भातशेती, फळबागा आणि भाजीपाला शेतीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषी विभाग सक्रिय झाला असून बी-बियाणांची निवड, बीजप्रक्रिया यासंदर्भात मार्गदर्शन शिबिरांचे नियोजन येत्या १५ दिवसांत केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतांची मागणी आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे होणारी ही प्रक्रिया कोणत्याही खंडाशिवाय यंदाही पार पाडली जाणार आहे. तसेच कोणतीही योजना बंद पडणार नाही.

ठाणे जिल्ह्यात आंबा, चिकू, काजू, सीताफळ यांसारख्या फळबागांची लागवड केली जाते. त्यासाठी आवश्यक बियाणे मिळवण्यासाठी आणि त्याची वाहतूक करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना परवानगीपत्रही देणार आहे.

मार्गदर्शन शिबीर १५ मेपासून

बियाणांची, खतांची मागणी घेणे आणि ती शासनदरबारी कळवणे याबाबत कृषी विभागाने प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती अंबरनाथ तालुका कृषी विभागाने दिली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन १५ ते ३० मेदरम्यान केले जाणार असून संशोधित बियाणांचा वापर करण्यास सांगितले जाणार आहे.  फळबाग लागवडीसाठी ट्रॅक्टर, ट्रेलर, शेड नेट, पॉली हाऊ स, शेततळे यासाठीचे अर्ज मे महिन्यात घेतले जाणार आहेत.