ठाणे : महापालिकेकडून स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारपासून दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने गुरुवार, ७ जानेवारी रोजी रात्री १२ ते शुक्रवार रोजी रात्री १२ असा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाणे महापालिकेच्या कळवा, खारेगाव, पारसिकनगर, आतकोनेश्वर नगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई तसेच इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्रमांक १ या भागाचा पाणीपुरवठा २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

तसेच ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेंतर्गत येणाऱ्या श्रीनगर जलकुंभावरील, विवियाना जलकुंभावरील जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि जोडणी करणे, महात्मा फुलेनगर येथील मुख्य जलवाहिनीवरील पाण्याची गळती रोखणे, अशी कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते शनिवार, ९ जानेवारी रोजी सकाळी ९ असा २४ तासांसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.