ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध जलवाहिन्यांच्या जोडणीचे तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामांसाठी ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून आणि स्टेम प्राधिकरणाकडून शहराला होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

घोडबंदर भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ११५८ मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जोडणी मेट्रो प्रकल्पाच्या कामात अडसर ठरत असून ही जोडणी याच वाहिनीवर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच साकेत येथील मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे, बाळकुम जलकुंभाच्या वाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलणे आणि सोहम संप येथे नवीन विद्युत पॅनल बसविणे अशी कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहरात होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते शनिवार, १९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत असा चोवीस तास बंद ठेवण्यात येणार आहे.

यामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, गांधी नगर, जॉन्सन, इटर्निटी, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, मुंब्रा रेतीबंदर आणि कळव्याचा काही भागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.