ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण कंपनीकडून टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत रोहित्र दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून या कामामुळे शुक्रवार, १ मे रोजी शहराचा पाणीपुरवठा सहा तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामध्ये महापालिकेची स्वत:ची योजना, स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी आणि मुंबई महापालिका या स्रोतांचा समावेश आहे. टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रामधून स्टेम प्राधिकरण पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. प्राधिकरणाकडून शहरात दररोज ११० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत रोहित्रामधून तेलगळती होत असून शुक्रवारी त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सहा तासांचा अवधी लागणार असून या काळात शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवार, १ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.