अवघ्या पाच मिनिटांत घराचे कुलूप तोडून घर साफ करणाऱ्या एका सराईत चोरास वालीव पोलिसांनी अटक केली आहे. दिवसा बंद घरात चोरी करणे हे त्याचे वैशिष्टय़ होते.

वसईत गेल्या काही दिवसांपासून दिवसा घरफोडय़ा करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी दिवसा गस्त सुरू केली होती. बुधवारी पोलिसांना एक इसम संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आला होता. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांत त्याचा सहभाग आढळून आला. याबाबत बोलताना वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की, आरोपी अनिल राजभर हा कल्याण येथे राहतो. अवघ्या चार ते पाच मिनिटांत बंद घरांचे कुलूप तोडण्यात तो वाकबगार आहे. ज्या महिला बाजारात किंवा मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असायच्या त्यांच्या घरावर तो पाळत ठेवायचा. महिला बाहेर पडल्या की लगेच तो त्या इमारतीमध्ये शिरायचा आणि पाच मिनिटांच्या आत कुलूप तोडून घरात प्रवेश करायचा. घरातील कपाटातील मौल्यवान ऐवज लुटून तो १५ मिनिटांच्या आत पोबारा करायचा. त्याच्याकडून चोरीचा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती असतात तसेच चोरी करणे धोक्याचे असते, त्यामुळे तो दिवसा चोरी करायचा. त्याचे राहणीमान अत्यंत चांगले असायचे, त्यामुळे त्याच्यावर कुणाचा संशय येत नसायचा. तसेच तो उत्तम हिंदी आणि मराठी भाषा बोलायचा. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने तीन घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे.