अज्ञात चोरटय़ांनी रोख रकमेसह दागिने लुटले

नाताळनिमित्त चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनाविधीत वसईकर तल्लीन झालेले असतानाच निर्मळ परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. चोरटय़ांनी रोख रकमेसह नऊ  लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाताळच्या पूर्वसंध्येला म्हणजे २४ डिसेंबरला रात्री दहा वाजता चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. निर्मळ परिसरातील सर्व रहिवासी चर्चच्या प्रार्थनेसाठी गेली असताना दारसेंग या गावातील संजाव सराई आणि व्हॅलेरियन सराई यांच्या बंगल्यात चोरी करण्यात आली. संजाव सराई यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि घरातील ३५ हजारांच्या रोख रकमेसह मंगळसूत्र, नेकलेस, कर्णफुले, दोन अंगठय़ा, दोन सोनसाखळ्या, बांगडय़ा असा सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लुटून पोबारा केला.

रात्री साडेअकराच्या सुमारास संजाव सराई चर्चमधून घरी आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. घरात प्रवेश केल्यावर कपाट फोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याचवेळी संजाव यांचे शेजारी व्हॅलेरियन सराई यांच्या बंगल्यालाही चोरटय़ांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले. व्हॅलेरियन यांच्या बंगल्यातून  ३ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर २० हजार रुपयांची रोख चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची नालासोपारा पोलिसांनी दखल घेतली असून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना गस्तीचे निवेदन

नाताळनिमित्त वसईच्या पश्चिम पट्टय़ातील घराघरातील ख्रिस्ती भाविक २४ डिसेंबरच्या रात्री चर्चमध्ये जात असल्यामुळे गावात कोणीच नसते. अशा परिस्थितीत गावांमध्ये गस्त ठेवण्याबाबतचे निवेदन नगरसेवक मार्शल लोपीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नालासोपारा पोलिसांना दिले होते. भुईगाव, गास, निर्मळ, गोम्सआळी परिसर, मर्देस, उमराळे, नानभाट, नंदाखाल, बोळींज, आगाशी, अर्नाळा येथील सर्व चर्चमध्ये नाताळनिमित्त रात्री १० वाजता प्रार्थनाविधीचे आयोजन करण्यात येते. ही संधी साधत अनेक भुरटे आणि सोनसाखळी चोर स्थानिकांच्या घरांना लक्ष्य करतात. यास प्रतिबंध करण्यासाठी २४ डिसेंबरच्या मध्यरात्री गस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी नगरसेवक लोपीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तसेच नालासोपारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत लब्धे यांचीही भेट घेतली होती.

आमचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याद्वारे चोरटय़ांचा शोध घेतला जाईल. – वसंत लब्धे, पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे</strong>