ठाणे : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा शाळा बंद असल्याने २८ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेची राज्यस्तरीय परिषद आभासी माध्यमातून नुकतीच पार पडली. ‘शाश्वत जीवनासाठी विज्ञान’ हा यंदाच्या परिषदेचा मुख्य विषय होता. यात निवडलेल्या ३० उत्कृष्ट प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांचे आहेत, अशी माहिती विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली.

ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील २२ जिल्ह्यातील निवडक बालवैज्ञानिकांनी ११६ संशोधन प्रकल्प सादर केले होते. या परिषदेत एकाच वेळी मुंबई, पुणे – चिंचवड, नाशिक, धुळे आणि चंद्रपूर या पाच केंद्रांतून ऑनलाइन पद्धतीने परिषदेचे परीक्षण करण्यात आले होते. यामध्ये निवडण्यात आलेल्या ३० उत्कृष्ट प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प हे ठाण्यातील बालवैज्ञानिकांनी तयार केले असून त्यात ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील चार बालवैज्ञानिकांचा समावेश आहे, तर मुंबईचे चार, धुळ्याचे तीन, नाशिक, कोल्हापूर, रायगड प्रत्येकी दोन, उस्मानाबाद, नंदुरबार, रत्नागिरी, चंद्रपूर, जळगाव आणि बीड येथील प्रत्येकी एक असे प्रकल्प निवडण्यात आले. या परिषदेत ठाण्यामधील डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेतील जय कांबळे, सरस्वती सेकंडरी शाळेतील वेदांती पटवर्धन, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील अद्वय देव, ऐश्वर्या अय्यर, ऋतुजा नेने, सम्यक मोहपत्र, सरस्वती विद्यालय, ठाणे कनिष्ठ महाविद्यालयातील शिवम कोळेकर, श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमातील अनुसया कोनारा, डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद शाळेतील नंदन कार्ले आणि अंबरनाथमधील लिवे शाळेतील आर्यन कदम या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. ‘हात न लावता वाजणारी बेल’, ‘कमी खर्चातील प्रोफेशनल व्हाइट बोर्ड होम व्हिडीओ स्टुडिओ’, ‘कार्यालयीन जागा घरी केल्यावर पर्यावरणात झालेली सुधारणा’, ‘स्वच्छतेचा हरित मार्ग’, ‘चहाच्या गोळ्या’ असे विविध प्रकल्प या विद्यार्थ्यांनी तयार केले होते.