घोडा हा प्राणी म्हटल्यावर शर्यत अपरिहार्यपणे आलीच. संपूर्ण जगात घोडय़ांच्या शर्यतीला विशेष मान आहे. याशिवाय शर्यतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घोडय़ांचादेखील अश्वप्रेमींकडून आदर केला जातो. घोडय़ांच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे शर्यतीसाठी ओळखली जाणारी घोडय़ांची एक जात म्हणजे ‘थोरो’ ब्रीड.. सतराव्या ते अठराव्या शतकाच्या दरम्यान इंग्लंडमध्ये शर्यत हा उद्देश ठेवून घोडय़ांची ही जात तयार करण्यात आली. इतर घोडय़ांपेक्षा उंचीने जास्त असलेले हे घोडे दिसायलाही आकर्षक असल्याने अश्वप्रेमींच्या अधिक पसंतीस पडतात. इंग्लंडमध्ये असलेले मूळ घोडे ‘बार्क’ आणि ‘तुर्को नान’ या घोडय़ांचे मिळून थोरो ब्रीड तयार करण्यात आले. साधारण कोणत्याही घोडय़ांचे मूळ अरेबियन घोडय़ांचे असल्याने थोरो ब्रीडच्या घोडय़ांमध्ये देखील अरेबियन घोडय़ांचा अंश आढळतो. अठराव्या शतकात शर्यतीच्या या घोडय़ांची प्रसिद्धी जगभरात झाली. एकोणिसाव्या शतकात खास शर्यतीसाठी वापरले जाणारे हे घोडे ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान या ठिकाणी पाठवण्यात आले. प्रिन्स चार्ल्स दुसरा, प्रिन्स व्हिल्यम तिसरा, जॉर्ज पहिला यांनी थोरो ब्रीड नावारूपाला आणले. इंग्रजांसोबत थोरो ब्रीड भारतात आले. शर्यत आणि रायडिंगसाठी या घोडय़ांचा अधिकाधिक उपयोग केला जातो. १८७४ साली इंग्लंडमध्ये चार मैल अंतराची घोडय़ांची पहिली शर्यत सुरू झाली. घोडय़ांची शर्यत हा जगभरात प्रतिष्ठेचा खेळ मानला जात असल्याने घोडय़ासोबत मालकाची आर्थिक परिस्थिती भक्कम असणे आवश्यक आहे.
शर्यतीसाठी विशेष प्रशिक्षण
शर्यतीच्या खेळासाठी या घोडय़ांना विशेष प्रशिक्षण प्रशिक्षकाच्या माध्यमातून दिले जाते. अत्यंत खडतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून योग्य घोडय़ांची पारख शर्यतीच्या खेळासाठी केली जाते. सुरुवातीला घोडय़ांची वंशावळ पाहिली जाते. संबंधित घोडय़ाचा इतिहास, घोडय़ाला जन्म दिलेल्या घोडीणीच्या खेळाची नोंद घेतली जाते आणि त्यानुसार शर्यतीसाठी घोडय़ांची निवड केली जाते. घोडय़ांची निवड झाल्यावर वैद्यांच्या मार्गदर्शनाने या घोडय़ांचा उत्तम दर्जाचा आहार ठरवला जातो. इतर घोडय़ांपेक्षा आहाराचे प्रमाण जास्त असावे लागते. दोन र्वष प्रशिक्षण झाल्यानंतर शर्यतीच्या खेळासाठी घोडय़ाला पात्र ठरवले जाते. प्रशिक्षणासाठी असलेल्या लहान घोडय़ाला ‘बेनॉल्ट’ आणि ‘फिरनी’ तर प्रशिक्षण पूर्ण झालेल्या मोठय़ा घोडय़ांना ‘मेनुर’ संबोधतात. दोन ते तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर शर्यतीत पाच वर्षांपर्यंत या घोडय़ांचे शर्यतीचे आयुष्य असते. शर्यतीसाठी उपयुक्त नसलेले घोडे स्पर्धेतून बाहेर काढले जातात. पूर्वी या घोडय़ांना मारुन टाकले जायचे. मात्र अलीकडे शर्यतीसाठी उपयुक्त नसलेल्या घोडय़ांना अश्वप्रेमींना विकले जाते.
शर्यतीसाठी इंग्लंडमधील अ‍ॅस्कॉट या ठिकाणी तसेच दुबईमध्ये जगभरातील घोडय़ांची गर्दी पाहायला मिळते. भारतात रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या अंतर्गत घोडय़ांच्या खेळांचे आयोजन होत असते. इतर घोडय़ांच्या तुलनेत या घोडय़ांचा साज अधिक असल्याने थोरो ब्रीडच्या घोडय़ांचे पालन अधिक खर्चीक ठरते.

खेळात विशेष प्रावीण्य
शर्यतीच्या खेळाप्रमाणेच थोरो ब्रीड इतर काही खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात. शर्यतीबरोबरच पोलो, शो जम्पिंगसारख्या खेळात थोरो ब्रीडच्या घोडय़ांना मान असतो. पोलो या खेळ प्रकारात घोडय़ावर बसून घोडेस्वाराला हॉकीसारखा खेळ खेळावा लागतो. दोन समूहात हा खेळ खेळण्यात येतो. घोडा आणि घोडेस्वार या दोघांचे कौशल्य या खेळात पाहिले जाते. तसेच शो जम्पिंग या खेळात घोडय़ांच्या उंचीप्रमाणे शर्यतीत अडथळे ठेवण्यात येतात. सर्वात जास्त आणि कठीण अडथळे पार करत निश्चितस्थळी पोहचणाऱ्या घोडय़ांना विजयी ठरवण्यात येते. शो जम्पिंग या खेळ प्रकारात भारतीय सैन्यातील घोडदलाने प्रावीण्य मिळवले आहे.