23 October 2020

News Flash

आता ‘काँगो तापा’चा धोका

पालघरनंतर ठाणे जिल्ह्य़ात सुरक्षेच्या उपाययोजना

पालघरनंतर ठाणे जिल्ह्य़ात सुरक्षेच्या उपाययोजना

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ या रोगाचा धोका निर्माण होऊ  लागला आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यास किंवा त्याचे मांस खाल्ल्यास हा रोग मानवाला होतो, असा निष्कर्ष काढत पालघर जिल्ह्य़ातील आरोग्य विभागाने यासंबंधी धोक्याची सूचना देताच ठाणे जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गुजरातमधील सीमावर्ती भागात काँगो तापाची लक्षणे दिसल्याने पालघरपाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ातही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून गोचिड निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार प्राण्यांवर फवारणी करण्यात येत आहे. तसेच गुजरात राज्यातून पशूंची वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवले जात आहे. ठाणे जिल्ह्याला करोनाचा विळखा बसला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात आता गुजरातमधील कच्छ आणि बोताड जिल्ह्यांमध्ये काँगो फीव्हर या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. पशूंवर असलेल्या गोचीड, पिसवा यांमुळे हा आजार होतो, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. एखाद्या बाधित जनावराच्या रक्ताशी संपर्क झाल्यास किंवा बाधित पशूचे मांस खाल्ल्यास हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधून शेळी, मेंढी यांची मोठय़ा प्रमाणात पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये वाहतूक होत असते. त्यामुळे पालघरमध्ये इशारा देण्यात आला असून गुजरातमधून येणाऱ्या या पशूंची पालघरच्या तपासणी नाक्यांवर चाचणी केली जात आहे.

ठाणे जिल्हा हा पालघर जिल्ह्याला लागून आहे. तसेच गुजरातहून आलेल्या पशूंची पालघर मार्गेच ठाण्यात वाहतूक केली जाते. तपासणी इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याला सध्या तरी या रोगाचा धोका नाही, असे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. तरीही जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ७ लाख २६ हजार पशुधन आहे. त्यामुळे वाहतूक रोखण्यासोबतच गाई, बैल, मेंढी, बकरे यांच्यासह इतर पाळीव जनावरे आणि भटक्या प्राण्यांवर गोचीड निर्मूलनासाठी फवारणी केली जाणार आहे, तर तालुका पातळीवरही या संदर्भात बैठकांचे आयोजन केले जात आहे. गुरुवारी या रोगासंदर्भात एका बैठकीचेही आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रोगाची लक्षणे

* बाधित व्यक्तींमध्ये सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटीचा त्रास.

* डोळे लाल होणे, घशात तसेच जबडय़ाच्या वरच्या भागात फोडी येणे

* आजार बळावल्यास रक्तस्राव, नाकातून रक्त

* मृत्यूचे प्रमाण ३० टक्के

प्रतिबंधात्मक उपाय

* शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकांनी गोठय़ाची स्वच्छता राखावी, मुखपट्टी, हातमोजे, पायांना पूर्ण झाकणाऱ्या बुटांचा वापर.

* रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी जागृतीवर भर, गोचिड निर्मूलन कार्यक्रम कीटकनाशक फवारणी.

* गोचिड हाताने काढणे वा मारणे कटाक्षाने टाळावे

‘काँगो ताप’ काय आहे?

एखाद्या बाधित जनावराच्या संपर्कात आल्यास मानवाला हा रोग होण्याची शक्यता असते. तसेच हा आजार बळावल्यास मृत्यूचे प्रमाण ३० टक्के आहे. या रोगावर अद्याप उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून या रोगावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

ठाणे जिल्ह्याला काँगो फीव्हर या रोगाचा अद्याप धोका नाही. मात्र, जिल्ह्यात आम्ही सर्व ठिकाणी गोचीड निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच पशुपालन करणाऱ्यांनाही या रोगाची माहिती देणार आहोत.

– डॉ. व्ही. व्ही. धुमाळ, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, ठाणे जिल्हा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 2:33 am

Web Title: threat of congo fever in thane district zws 70
Next Stories
1 ट्रान्स हार्बरवर लोकल फेऱ्यांत वाढ
2 बहरलेल्या झेंडूला करोनाची ‘बाधा’
3 मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडूनही कारवाई
Just Now!
X