संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव

ठाणे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मुलुंड चेकनाका, आनंदनगर आणि कळवा या तिन्ही भागांतील कमानी धोकादायक झाल्या असून या कमानीखालून दररोज शेकडो वाहने वाहतूक करीत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर तिन्ही प्रवेशद्वारावरील धोकादायक कमानी काढून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवरील आनंदनगर आणि मुलुंड चेकनाका या ठिकाणी ठाणे महापालिकेने कमानी उभारलेल्या आहेत. तसेच कळवा आणि नवी मुंबई शहराच्या वेशीवरही अशाच प्रकारे कमान उभारण्यात आलेली आहे. या तिन्ही कमानी जुन्या झाल्याने त्याचे बांधकाम धोकादायक झाले आहे. वर्षभरापूर्वी मुलुंड चेकनाका येथील कमानीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर या कमानीच्या बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या कमानीखाली मुंबई आणि ठाण्यातील रिक्षांचे थांबे असून त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात रिक्षा उभ्या असतात. तसेच या कमानीखालून दररोज ठाणे आणि मुंबईच्या दिशेने शेकडो वाहनांची वाहतूक  सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन महापालिकेने या कमानी तोडण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.

पालिकेचा प्रस्ताव

ठाणे शहराच्या वेशीवरील मुलुंड चेकनाका, आनंदनगर आणि कळवा या तिन्ही भागांतील कमानींच्या लोखंडी बांधकामावर सुशोभीकरणासाठी राजस्थानी दगड बसविण्यात आले आहेत. हे दगड तात्काळ काढून टाकावेत, असे बांधकाम संरचनात्मक परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या कमानी खूपच जुन्या असल्यामुळे त्याचा धोकादायक भाग पडून जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी आयुक्त जयस्वाल यांनी कमानी तोडण्याचे निर्देश दिले आहेत, असे महापालिकेच्या प्रस्तावात म्हटले आहे.