आनंदनगर, कासारवडवली, ओवळा येथे ‘एमएमआरडीए’कडून उभारणी

ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारने नवे रस्ते, उड्डाणपूल, बाह्य़ वळण रस्त्यांची युद्धपातळीवर आखणी सुरू केली असून भिवंडी-शिळफाटा उन्नत मार्गास मंजुरी दिल्यानंतर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरात तब्बल तीन ठिकाणी नवे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मान्यता दिली असून महामार्ग तसेच घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी आनंदनगर, कासारवडवली आणि ओवळा येथे या पुलांची उभारणी केली जाणार आहे

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यापूर्वीच तीन नव्या उड्डाणपुलांची बांधणी सुरू केली आहे. ठाणे महापालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन हात नाका येथे लाल बहादूर शास्त्री मार्गास लागून आणखी एका उड्डाणपुलाच्या उभारणीचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे ठेवला आहे. या पाश्र्वभूमीवर कोपरी उड्डाणपुलालगत आनंदनगर, कासारवडवली आणि ओवळा येथे आणखी तीन उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्याचबरोबर या मार्गावर कासारवडवली आणि ओवळा येथे दोन नवे पूल उभारले जाणार आहे. या दोन पुलांची उभारणी प्रत्यक्षात येताच या मार्गावरील उड्डाणपुलांची संख्या पाच होणार असून एका अर्थाने हा मार्ग उन्नत होईल, असा दावा सूत्रांनी केला. या पुलांची आखणी कशी असावी यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून निविदाही काढण्यात आल्या आहेत.