कात्रप भागातील नवीन डीपी रोड परिसरातील गणेश कृपा को-ऑप. हौ. सोसायटी व कात्रपमधीलच स्नेह दर्शन को-ऑप. हौ. सोसायटी तसेच आपटेवाडी शिरगाव येथील पद्मप्रभा को-ऑप. हौ. सोसायटी या इमारतींना अखेर कुळगाव बदलापूर नगरपालिकेने धोकादायक ठरवले आहे. काही दिवसांपूर्वी कात्रप भागातील गणेश कृपा को-ऑप. हौ. सोसायटी दुकानांसमोरील व्हरांडा खचून त्यावरील टपरी ७ ते ८ खोल नाल्यात पडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व मोठी वित्तहानी झाली नसली तरी त्यामुळे या शहरातील इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यांमुळे पालिकेने शहरातील धोकादायक इमारती व घरांना नोटीसा बजवाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीच पश्चिम दिल्ली येथे चार मजली धोकादायक इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. असा कटू प्रसंग शहरात होऊ नये यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी धोकादायक बांधकामांचा आढावा घेत त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यात संपूर्ण शहरात एकूण तीन इमारती, एक चाळ, एक दुकान व तीन घरे धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सगळ्या बांधकामांना पालिकेने धोकादायक असल्याच्या नोटीसा बजावल्याचे नगर अभियंता प्रवीण कदम यांनी सांगितले. जीर्णावस्थामुळे गणेश कृपा को-ऑप. हौ. सोसायटी या इमारतीच्या तळमजल्याशेजारी असलेल्या नाल्यावरील स्लॅब पावसाळ्यामध्ये कोसळला आहे. त्यामुळे इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या आरसीसी भिंतीचे स्टील व काँक्रिट बऱ्याच प्रमाणात निघून कमकुवत झाले आहे. त्यामुळे इमारतीला धोका होण्याची तसेच जीवित वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले असल्याची माहिती नगर अभियंत्यांनी दिली. महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्य्ोगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये सदर घरांची स्वखर्चाने दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा रिकामे करावे तसेच दुरुस्ती अभावी होणाऱ्या नुकसानीस सोसायटीच जबाबदार असेल.