नोडल अधिकारी, महापालिकेची टोलवाटोलवी; संसर्ग वाढण्याची भीती

अंबरनाथ : एप्रिल महिन्यातच करोना रुग्णमुक्त शहराची घोषणा करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना पुन्हा समोर आला आहे. मंगळवारी जाहीर केलेल्या रुग्णांच्या यादीतील तीन रुग्ण बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे तीन रुग्ण सापडत नसल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असून याबाबत पालिका अधिकारी आणि नोडल अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचेही समोर आले आहे.

एप्रिल महिन्यातच करोनामुक्त शहर अशी घोषणा करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी तोंडावर पडले होते. त्यानंतर अंबरनाथ शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचा ताळमेळ नसल्याचे समोर येत असतानाच मंगळवारी बाधित रुग्णांच्या यादीतील तीन रुग्ण बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील सिद्धार्थनगर, शिवनगर अशा भागातील हे रुग्ण असून त्यांचा करोना अहवाल आल्यानंतर पालिकेने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र ते आढळून आले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट त्यांची नावे, मोबाइल क्रमांक आणि पत्ते जाहीर केले आहेत. बाधित व्यक्तींची नावे जाहीर केल्यास त्यांच्या संपर्कातील इतरांना माहिती मिळेल या दृष्टीने ही नावे जाहीर केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या रुग्णांबाबत विशेष नियुक्त नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड यांना विचारले असता त्यांनी पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या असे सांगितले, तर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी वर्षां बांगर यांना विचारले असता, हे काम नोडल अधिकारी यांचे आहे, याबाबत तेच सांगू शकतात, असे त्यांनी सांगितले. पालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी त्या रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.