भिवंडी येथील वडपे गावातील चौकीजवळ गुरुवारी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नाकाबंदीदरम्यान एका वाहनातून पावणेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड लपविण्यासाठी गाडीमधील सीटखाली लॉकर बनविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची शुक्रवारी जामिनावर सुटका केली आहे. मुंबईतील एका सराफाची ही रोकड असल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच या रोकडबाबत पोलिसांनी माहिती देताच प्राप्तिकर विभागानेही त्यासंबंधी चौकशी सुरू केली आहे.
एका वाहनामधून मोठय़ा प्रमाणात रोकडची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणच्या भिवंडी तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या भिवंडीतील वडपे चौकीजवळ गुरुवारी सकाळपासून पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. या तपासणीदरम्यान एका गाडीच्या सीटखाली असलेल्या लॉकरमध्ये दोन कोटी ८४ लाखांची रोकड मिळाली. तसेच या रोकडबाबत ठोस उत्तरे मिळत नसल्यामुळे पोलिसांनी आशीष पटेल आणि लतेश पटेल या दोघांना अटक केली. इंदूरमधून आणलेली ही रोकड सांताक्रूझ येथे नेण्यात येणार होती. सांताक्रूझमधील एका सराफाची ही रोकड असून त्याने व्यवसायातील वसुलीची ही रक्कम असल्याचा दावा केला आहे.प्राप्तिकर विभागानेही रोकडसंबंधी चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी दिली.