भगवान मंडलिक

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची परवड; सलग ४८ तास सेवेमुळे डॉक्टरांवर ताण

शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दररोज वैद्यकीय उपचारासाठी सुमारे तीन हजार रुग्ण ग्रामीण, आदिवासी भागातून येतात. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन वैद्यकीय अधिकारी तारेवरची कसरत करून सध्या रुग्णसेवा देत आहेत. ओढाताण करून रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्ण, नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पुरेसे वैद्यकीय अधिकारीच नाहीत तर किती तास रुग्णसेवेसाठी द्यायचे, असा प्रश्न सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम असल्याच्या पानभर जाहिराती माध्यमांत झळकत असताना शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास येत नाही का, असे प्रश्न या भागातील जाणकारांकडून केले जात आहेत. स्थानिक आमदार, खासदार या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्ण नातेवाईकांमध्ये नाराजी आहे. कसारा, डोळखांब, लेनाड, किन्हवली परिसरातील गोरगरीब रुग्णांना शहापूर ग्रामीण रुग्णालय मोठा आधार आहे. शहापूर तालुक्यात आदिवासी भाग अधिक आहे. खासगी रुग्णालयातील महागडी सेवा परवडत नसल्याने बहुतांशी रुग्ण शहापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात. उपचारासाठी पुरेसे डॉक्टर नसल्याने रुग्ण, नातेवाईक नाराजी व्यक्त करीत आहेत. शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. १०० खाटांचे रुग्णालय आहे. दररोज तालुक्याच्या विविध भागातून विविध प्रकारचे तीन हजार रुग्ण येथे उपचारासाठी येतात, असे रुग्णालयातील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले.

पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता रुग्ण सेवेसाठी कामावर हजर झालेला वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता काम संपवतो. अशावेळी, अन्य डॉक्टर आला नाहीतर त्याच डॉक्टरला पुन्हा सेवा सुरू ठेवावी लागते. अनेक वेळा एक डॉक्टर ४८ तास काम करतो, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

‘दर महिन्याला अहवाल’

रुग्ण सेवेसाठी हे डॉक्टर अपुरे पडतात. आरोग्य विभागाला डॉक्टर कमतरतेबाबत दर महिन्याला अहवाल पाठविले जातात. आरोग्य विभागाकडून या नेमणुका होत असल्याने त्यांनाही या परिस्थितीची माहिती आहे. उपलब्ध डॉक्टरांच्या क्षमतेने आहे ती रुग्ण सेवा दिली जाते. ग्रामीण रुग्णसेवा महत्त्वाची असल्याने अन्यत्र जाण्याची आपली इच्छा होत नाही. ग्रामीण रुग्णालयात येण्यास शहरी भागातील डॉक्टर तयार होत नाहीत. मागील २४ वर्षे आपण आदिवासी, दुर्गम भागात सेवा देत आहोत. ग्रामीण रुग्णसेवा खऱ्या अर्थाने रुग्णसेवा असते. त्याचे महत्त्व अनेकांना पटत नाही. शस्त्रक्रिया गृह सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे ते काम पूर्ण झाले की मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुरू केल्या जातील, असे शहापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई यांनी सांगितले.