२५ तोळे सोन्याची चोरी; हल्ल्यात तीन जण जखमी

अंबरनाथ : चिखलोली परिसरामधील एका सराफी पेढीत रविवारी दुपारी चार जणांनी सशस्त्र दरोडा घालून २५ तोळे सोने लुटून नेले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेढी मालकासह तीन जण जखमी झाले आहेत.

अंबरनाथ पश्चिमेकडील चिखलोली-सर्वोदयनगर भागातील तुलसी सानिध्य इमारतीत ‘भवानी ज्वेलर्स’ ही सराफी पेढी आहे. रविवारी दुपारी पेढीचे मालक वसंत सिंग (२६) काही कामानिमित्त बाहेर गेले होते. पेढीमध्ये भैरव सिंग (२२) नावाचा एक कर्मचारी होता. दुपारी १ वाजता दुचाकीवरून आलेले चार दरोडेखोर पेढीत शिरले आणि त्यांनी बंदूक तसेच चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. त्याच वेळेस पेढीचे मालक वसंत सिंग हे तेथे आले आणि त्यांनी दरोडेखोरांना विरोध केला. त्याचदरम्यान पेढीत आलेल्या लक्ष्मण सिंग यांनीही दरोडेखोरांना विरोध केला. या झटापटीत दरोडेखोरांनी  गोळीबार सुरू केला. तसेच एका दरोडेखोराने चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.

या वेळी झालेल्या झटापटीत वसंत सिंग, भैरव सिंग आणि लक्ष्मण सिंग हे तिघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण यांच्या हाताला आणि पोटाला दोन गोळ्या लागल्या आहेत, तर वसंत आणि भैरव या दोघांवर चाकूचे वार करण्यात आले आहेत. घटनास्थळी चार जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासासाठी पाच पथके

दरोडेखोरांनी सुमारे २५ तोळे सोने लांबवले आहे. तिघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा समातंर तपास करण्यात येत आहे.