मुसळधार पावसामुळे ठाणे येथील सावरकरनगर भागात म्हाडा वसाहतीमधील एका घराचे पत्रे कोसळून तिघे जखमी झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. जखमींमध्ये एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा समावेश आहे. या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सावरकरनगर येथील म्हाडा वसाहतीमधील आराधना सोसायटीमध्ये संपदा संदेश भोसले (४६) या दोन मुलांसोबत राहात असून सुयश (१८) आणि सिद्धेश (२०) अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. त्यांनी घराच्या पत्र्यावर कौले बसविली होती. परंतु पत्र्याला आधार देण्याकरिता बसविण्यात आलेले लोखंडी अँगल जुने झाले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस कोसळत असतानाच पत्र्यावर पाण्याचे वजन वाढले आणि त्यामुळे लोखंडी अँगल तुटून पत्रे खाली कोसळले. संपदा आणि त्यांची दोन्ही मुले घरात झोपलेली असताना ही घटना घडली. त्यामुळे या घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संपदा यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला आहे आणि सुयशच्या डोक्याला टाके पडले आहेत. तर विजेचा धक्का लागल्याने सिद्धेश  जखमी झाला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.