19 October 2019

News Flash

300 रुपये सर्व्हिस चार्ज लावल्याने विचारला जाब, बिअर बाटलीने तरुणांना जबर मारहाण

तिघे तरुण गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

सर्व्हिस चार्ज लावल्याचा जाब विचारल्याने तीन तरुणांना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मीरा रोडमध्ये ही घटना घडली आहे. तरुणांनी जेवणाच्या बिलात 300 रुपये सर्व्हिस चार्ज लावल्याचा जाब मॅनेजरला विचारला होता. यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.

तिघे तरुण जखमी असून त्यांनी भाईंदर येथील टेंभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी हॉटेलचा मॅनेजर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही.

तक्रारदार संदेश परते यांचा मिरा रोडमध्ये फोटोग्राफी स्टुडिओ आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आपले मित्र आनंद काळे आणि प्रशांत वाघमारे यांच्यासोबत लक्ष्मी पार्क येथील पार्क व्ह्यू हॉटेलमध्ये ड्रिंक आणि डिनरसाठी गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.

तिघा तरुणांनी आपल्यासोबत दारु नेली होती. मॅनेजरने त्यांना हॉटेलमध्ये दारु पिण्याची परवानगी दिली होती. 10 वाजण्याच्या सुमारास डिनर संपल्यानंतर वेटरने त्यांना 1 हजार 100 रुपयांचं बिल सोपवलं. यामध्ये 300 रुपये सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला होता. आनंद काळे यांनी मॅनेजरला जाब विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मॅनेजरने आनंद काळे यांच्या कानाखाली मारल्यानंतर संदेश आणि प्रशांत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही मॅनेजर, वॉचमन, वेटर आणि 30 अज्ञात लोकांनी बीअर बाटली, पटट्टा आणि काठीच्या सहाय्याने मारहाण केली.

First Published on January 9, 2019 5:46 pm

Web Title: three men assaulted after raise question over 300 rs service charge