News Flash

आदल्या दिवशीही स्फोटांच्या घटना?

डोंबिवली एमआयडीसीत प्रोबेस कंपनी ज्या परिसरात आहे तेथे गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला.

विविध कंपन्यांमधील कामगारांची माहिती
डोंबिवली एमआयडीसीत प्रोबेस कंपनी ज्या परिसरात आहे तेथे गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. त्या परिसरात रात्रीच्या वेळेत किरकोळ प्रकारचे तीन लहान स्फोट (रोहित्र उडाल्यानंतर येणारा आवाज) झाल्यासारखे आवाज आले होते, अशी धक्कादायक आणि संशय निर्माण करणारी माहिती भीषण धक्क्यातून सावरलेली या भागातील विविध कंपन्यांमधील कामगार मंडळी आता देऊ लागली आहेत. गुरुवारी भीषण स्फोट होण्यापूर्वी या परिसरात रात्रीच्या वेळेत महावितरणचे रस्त्यावरील रोहित्र उडाल्यानंतर जसा आवाज होतो, त्यापेक्षा कमी पट्टीच्या आवाजाचे लहान तीन स्फोट झाल्यासारखे अनेक कामगारांनी ऐकले होते. परंतु ते नेहमीप्रमाणे रोहित्र स्फोटाचे असतील किंवा कारखान्याबाहेर काही तरी शॉर्टसर्किटने झाले असेल म्हणून प्रत्येक कामगाराने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्री झालेले ते स्फोटाचे आवाज कोठून आले, ते स्फोट कशाचे होते याची चर्चा या घटनेनंतर आता कामगारांमध्ये सुरू झाली आहे. एमआयडीसीतील अनेक कंपन्यांचे प्रवेशद्वार चोवीस तास बंद असते, असे असतानाही त्या कंपनीत कधी कच्चा माल येतो, पक्का माल बाहेर नेला जातो. हेही कळत नाही. अशा कंपन्यांमधील उत्पादन, तेथे होणाऱ्या उलाढाली या आता संशयास्पद वाटू लागल्या आहेत. कंपन्यांमधील अशा संशयास्पद हालचालींवर वेळीच देखरेख ठेवणे आता आवश्यक वाटू लागले आहे. याबाबतची पूर्वीच दखल घेतली गेली असती तर अशा स्फोटासारख्या प्रकार रोखता येऊ शकले असते. रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी या भागातील कामगारांकडून करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 4:04 am

Web Title: three minor explosion during night time at probace enterprises chemical unit area
Next Stories
1 जखमींवरील उपचाराचा खर्च देणार कोण?
2 कल्याण, डोंबिवलीच्या तहानेची तरतूद
3 वडोदरा महामार्गाचे सर्वेक्षण बंद पाडले
Just Now!
X