बनावट शस्त्र विक्री प्रकरणी आणखी तिघांना अटक
ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये बनावट परवान्यांच्या आधारे शस्त्र विक्री करणारी टोळी नुकतीच ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केली असून या टोळीच्या तपासादरम्यान ठाणे ते पंजाब राज्यापर्यंत एक मोठी साखळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. तसेच पंजाब राज्यातील शस्त्र विक्रेते गौरव अरोरा आणि जसवींदर सिंगबिंद्रा या दोघांमार्फत हा उद्योग सुरू असल्याचेही समोर आले असून त्यांना बनावट शस्त्र परवाने तयार करून देण्यासाठी अमृतसर जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन लिपीक मदत करीत असल्याचेही उघडकीस आले आहे. या लिपीकांना एका बनावट परवान्यामागे त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये मिळत होते. याप्रकरणी दोन लिपीकांसह एका शस्त्रविक्रेत्याला अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
तेजेंदरदीप हरविंदरसिंग आणि लखविंदरसिंग अशी लिपीकांची नावे आहेत. या दोघांसह गौरव अरोर यास पोलिसांनी अटक केली असून जसवींदर हा फरार आहे. ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये बनावट परवान्यांच्या आधारे पिस्तुलांची विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अटक केली होती. गेल्या वर्षी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी निधानसिंग सतोखसिंग भुई (४५) याला नुकतीच अटक केली असून तो या टोळीचा मुख्य दलाल आहे.
चाकूचा धाक दाखवून सोनसाखळीची चोरी
बदलापूर – आनंदनगर भागात मित्राला सोडून दुचाकीने परतत असलेल्या एका तरुणाला चाकूचा धाक दाखवत चोरटय़ांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी लुटून नेल्याची घटना एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री घडली.
बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी भागात रहाणारा २६वर्षीय तरुण मित्राला आनंदनगर येथील एका कंपनीजवळ सोडण्यासाठी गेला होता. तेथून दुचाकीवरून घरी परतत असताना तो एमआयडीसी परिसरात लघुशंकेसाठी थांबला. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी काढून घेतली. तसेच त्याच्या मोटारसायकलची चावीही त्यांनी काढून घेतली आणि त्यानंतर त्यांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच दिवशी तीन चोरीच्या घटना
ठाणे – उल्हासनगर येथील कॅम्प नं ४ मधील नेताजी रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी सोमवारी चोरी झाल्याची घटना घडली. चोरटय़ांनी स्वयंपाक खोलीच्या खिडकीवाटे घरात प्रवेश करत कपाटातील दोन लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला. दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेत राहणारी एक व्यक्ती सोमवारी घराबाहेर गेली होती. त्यावेळी चोरटय़ांनी घराच्या दरवाजाचे टाळे तोडून सुमारे एक लाख ५२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. तिसऱ्या घटनेत कळवा परिसरात रहाणाऱ्या एका महिलेच्या घरात चोरी झाली आहे. ही महिला सोमवारी सकाळी घराबाहेर गेली असता चोरटय़ांनी घराचे लॅच तोडून सुमारे दोन लाख १८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरीच्या घटनांत वाढ
कल्याण – शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वेतील कोळसेवाडी येथे राहणारी एक महिला, नेतिवली परिसरात राहणारी एक महिला त्याचप्रमाणे डोंबिवलीत राहणारी एक महिला यांची मंगळसूत्रे चोरीला गेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.

एकाच चाळीत तीन घरफोडय़ा
ठाणे – मानपाडा येथील दुर्गानगरमधील एका चाळीमधील तीन घरे फोडून चोरटय़ांनी सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चाळीतील रहिवाशी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्या संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी डाव साधला.
या चाळीत रहाणाऱ्या संध्या वाघमारे व हेमंत कांबळे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी घरातील साडे तीन लाखांचा ऐवज चोरला. तसेच तानाजी चौधरी यांच्याही घराचाही कडीकोयंडा चोरटय़ांनी तोडला. मात्र त्यांच्या घरातील वस्तू चोरीला गेले नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच लाखांच्या मालाचा अपहार
उल्हासनगर – कॅम्प नं ५ मधील वसंत बहार भागातील काळीराम कॉम्प्लेक्समधील एका कारखान्यातील कामगार पाच लाखांचा माल घेऊन पसार झाला आहे.
मालकाने त्या कामगारास कारखान्यातील जिन्स पॅन्ट देऊन त्या वॉश करण्यासाठी अंबरनाथ पुर्वेतील बारकुपाडा येथील सत्या वॉश गाळ्यात नेण्यास सांगितले.
मात्र, तो तिथे घेऊन गेलाच नाही. हा सर्व माल घेऊन तो पसार झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.