मीनाताई ठाकरे चौक ते खोपट पुलाची रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी

किशोर कोकणे, ठाणे</strong>

ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे चौक ते खोपट उड्डाणपुलावर उद्घाटनानंतर अवघ्या २० दिवसांत तीन गंभीर अपघात झाले असून, त्याची वाहतूक पोलीस आणि रस्ते सुरक्षा समितीने गंभीर दखल घेतली आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या सदस्यांनी सोमवारी या पुलाची पाहणी केली. काही ठिकाणी काम अर्धवट असताना घाई गडबडीने उद्घाटन करण्यात आल्याचा आणि सुरक्षा उपायांमध्ये त्रुटी राहिल्याचा मुद्दा पुढे आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मीनाताई ठाकरे चौक ते खोपट उड्डाणपुलावर होणाऱ्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या सदस्यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. शहरातील अंतर्गत मार्गावर होणारी कोंडी रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नौपाडा, तीन पेट्रोल पंप आणि मीनाताई ठाकरे चौक येथे तीन उड्डाणपूल बांधले. तीन पेट्रोल पंप येथील उड्डाणपुलाचे बांधकाम केव्हाच पूर्ण झाले आहे. मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा येथील उड्डाणपुलांचे ३ मार्चला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. खोपटच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र कोर्ट नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचे काम अद्याप अर्धवट आहे. तरीही निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घाईघाईत या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी एका भरधाव दुचाकीची धडक उड्डाणपुलाच्या खांबाला बसली. यात जीतेंद्र धोत्रे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत एका दुचाकीस्वाराला याच पुलावर अपघात झाला. या अपघातात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. शुक्रवारी पुन्हा एका भरधाव दुचाकीस्वाराला याच पुलावर भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की, त्याची दुचाकी एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर फेकली गेली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या उड्डाणपुलावरील सुरक्षा उपायांविषयी संशय व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या उपाययोजनांचा अभाव

अपघातांची दखल घेत जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सचिव आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी तात्काळ या पुलाची पाहणी केली. त्यात पुलावर महत्त्वाच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ठाणे महापालिकेला यासंदर्भात पत्र पाठविले आहे. तसेच लवकरात लवकर या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

आवश्यक उपाययोजना

* जिथे अपघात झाले तो भाग खूप वळणदार आहे. वाहनसंख्या कमी असल्याने अनेक चालक वाहने भरधाव चालवतात. पुढे अचानक वळण आल्याने अपघात होतात. त्यामुळे या ठिकाणापासून ५० मीटरवर तीन ते चार ठिकाणी पांढऱ्या पट्टय़ा रंगवणे आवश्यक आहे.

* अपघातप्रवण स्थळ असल्याचे चालकाच्या लक्षात यावे, यासाठी या ठिकाणापासून काही अंतरावर लुकलुकणारा दिवा बसवणे आवश्यक आहे.

* पुलाच्या उतारावर बांधलेला डांबरी गतिरोधक पूल उतरण्याच्या ३० मीटर अलीकडे बांधल्यास उड्डाणपुलाखालून आणि पुलावरून येणाऱ्या वाहनांचे अपघात टळतील.

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आम्ही उड्डाणपुलाचे सर्वेक्षण केले. अपघात टाळण्यासाठी उपापयोजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. महापालिकेने तात्काळ उपाययोजना केल्यास भविष्यातील अपघात रोखणे शक्य होईल.

– श्याम लोही, ठाणे जिल्हा रस्ते सुरक्षा समिती, सचिव