खंडणी न देणाऱ्या तीन दुकानदारांना जबर मारहाण
एखाद्या जुन्या हिंदी चित्रपटातील दृश्यासारखे दृश्य अंबरनाथमध्ये मंगळवारी पाहावयास मिळाले. नियमित मासिक हप्ता देण्यास नकार देणाऱ्या तीन दुकानदारांना स्थानिक गुंडांनी जबर मारहाण करून त्यांच्या मालाचे नुकसान केल्याची घटना येथे घडली. गेल्या कित्येक दिवसांपासून अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील व्यावसायिकांकडून हप्ते उकळण्याचे प्रकार वाढत चालले असून प्रत्येक विक्रेता, दुकानदाराकडून महिन्याची खंडणी वसूल केली जात आहे. यामुळे व्यावसायिकांत भीती असतानाच मंगळवारच्या घटनेने गावगुंडांची दहशत वाढवली आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही कार्यवाही केलेली नाही.
ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या काही महिन्यांपासून आयुक्तालय क्षेत्रातील गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील खंडणीखोरांवर वचक बसवणे अद्याप पोलिसांना जमलेले नाही. या ठिकाणी स्थानिक दुकानदारांकडून दरमहा नियमित रक्कम खंडणी म्हणून घेतली जात आहे.
स्थानकाच्या तीन क्रमांकाच्या फलाटाजवळील परिसरात फिरून हे गुंड खंडणी वसूल करतात. मंगळवारीदेखील हाच प्रकार सुरू असताना या परिसरातील हॉटेल, कुरिअर कार्यालय आणि एका चहावाल्याने खंडणी देण्यास नकार दिला. त्यावरून सन्नी, विजय पोवाडे यांच्यासह दहा जणांनी या तिघांना मारहाण केली. चहाची टपरी चालविणाऱ्या बाबू नांढवडेकर आणि कृष्णा हॉटेलचे चालक यांना गुंडांनी भरपूर मारहाण केली. या वेळी हॉटेलमधील प्रदीप कुमार यावर काचेच्या बाटलीने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर गुंडांनी आपला मोर्चाशेजारीच असलेल्या कुरियरच्या कार्यालयाकडे वळवला आणि मोडतोड केली. या प्रकरणी दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.