लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : परराज्यातून रेल्वे मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या प्रवाशांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून खबरदारी घेतली जात असून याठिकाणी आता रात्रीच्या वेळेतही रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांच्या शीघ्र प्रतिजन चाचण्या केल्या जात आहेत. स्थानक परिसरात आतापर्यंत ८५ हजार ८७७ चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ३६० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये रात्रीच्या वेळेत करण्यात आलेल्या सात हजार चाचण्यांमध्ये ३१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३० ऑगस्टपासून परराज्यातून रेल्वे मार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या ठाणे रेल्वे स्थानकात शीघ्र प्रतिजन चाचण्या केल्या जात आहेत.

सुरुवातीला दिवसा चाचण्या केल्या जात होत्या. तर, रात्रीच्या वेळेत चाचण्या केल्या जात नव्हत्या. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून स्थानकात रात्रीच्या वेळेतही चाचण्या सुरू केल्या आहेत. गेल्या १८ दिवसांत ७ हजार ११३ शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये त्यात ३१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० ऑगस्टपासून आतापर्यंत दिवसा ७८ हजार ७६४ शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या असून त्यात ३२९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

रोज सरासरी ७०० चाचण्या

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पंधरा दिवसांपूर्वी दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली. दररोज शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. असे असतानाही प्रशासनाकडून चाचण्यांच्या संख्या कमी करण्यात आली नव्हती. शहरात दररोज सहा हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात होत्या. तसेच ठाणे स्थानकात रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत दररोज दोनशे ते सातशेच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. तर दिवसाच्या वेळेत दररोज पाचशे ते दोन हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. दोन्ही मिळून आतापर्यंत ८५ हजार ८७७ चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ३६० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.