शिक्षकांच्या विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या प्रकरणानंतर खळबळ
मीरा रोड येथील एका नामांकीत शाळेत चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तीन शिक्षकांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नामांकित शाळेतील शिक्षकांकडून अशा प्रकारचे घृणास्पद वर्तन घडल्याने ‘आपले पाल्य सुरक्षित आहे का’ असा प्रश्न शहरातील पालकांना सतावू लागला आहे.
चौथीत शिकणाऱ्या या चिमुरडीवर हे तीन नराधम शिक्षक वर्षभर अत्याचार करत होते. त्यामुळे ही विद्यार्थिनी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तिच्या स्वभावातही बदल झाला होता. मुलीच्या वागण्या-बोलण्यातील फरक लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेतले. तेव्हा तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती त्यांना दिली. या तिन्ही शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, शहरातील एका नामािंकत शाळेत असा प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे.
‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हे शैक्षणिक संस्थांचे कर्तव्य आहे. शाळेत प्रवेश देताना ज्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली जाते. त्याचप्रमाणे शाळेत नेमण्यात येणाऱ्या शिक्षकांचीही पाश्र्वभूमी तपासणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक शाळेत एक पूर्णवेळ समुपदेशक नेमणेही बंधनकारक केले पाहिजे,’ असे मत एका पालकाने व्यक्त केले.
शाळेतील शैक्षणिक वर्गवगळता प्रयोगशाळा, वाचनालय, कार्यालय, शिक्षक वर्ग तसेच वावर कमी असलेल्या शाळेतील इतर भागात सीसीटीव्ही बसविणे ही आवश्यक बाब आहे व ती सर्व शैक्षणिक संस्थांनी आवर्जून पाळली पाहिजे, असे मीरा-भाईंदरमधील अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले. ‘आमच्या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. शाळेत ठरावीक कालावधीनंतर विद्यार्थ्यांसाठी पोलिसांकडून मार्गदर्शन करण्याचे कार्यक्रमही भरवण्यात येतात. मात्र, आता शिक्षकांसाठीही असे मार्गदर्शनसत्र आयोजित करण्याचा आमचा विचार आहे,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, या मुद्दय़ावर पोलीसही आपल्या परीने काम करत असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले. ‘शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता या विषयावर आम्ही आधीपासूनच शाळांत मार्गदर्शन शिबिरे घेतो. याशिवाय संस्थाचालक व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी सूचना केल्या जातात. त्यांची अंमलबजावणी केल्यास अशा घटना घडणार नाहीत,’ असा विश्वास बावचे यांनी व्यक्त केला.