20 November 2019

News Flash

दक्षिण भारतातील तिबोटी खंडय़ा येऊरच्या जंगलात

‘संवेदनशील’अशा दुर्मीळ पक्ष्याचे पारसिक डोंगरातही दर्शन

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश मुळे

विणीच्या हंगामासाठी दक्षिण भारतातून येणारा आणि कर्नाळा पक्षी अभयारण्यात दुर्मीळ म्हणून गणला गेलेला तिबोटी खंडय़ा हा पक्षी आता ठाणे जिल्ह्य़ातील येऊर वनपरिक्षेत्रात आणि मुंब्य्रातील पारसिक डोंगराच्या परिसरात दर्शन देऊ लागला आहे. अगदी कॅमेऱ्याच्या ‘फ्लॅश’ अथवा ‘क्लिक’ने लगेच सावध होऊन आपला निवारा बदलणारा हा पक्षी सध्या पक्षी अभ्यासकांचे आकर्षण बनला आहे.

ठाणे जिल्ह्य़ाला विस्तृत निसर्गसंपदा लाभलेली आहे. एका बाजूला खाडीकिनार तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या परिसरात अनेक दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास असला तरी तिबोटी खंडय़ाचे (ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर) दर्शन मात्र आजपर्यंत झाले नव्हते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या हरितक्षेत्रात आकर्षक अशा तिबोडी खंडय़ा पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. या ठिकाणी हे पक्षी दरवर्षी मोठय़ा संख्येने प्रजननाकरिता दाखल होतात. कर्नाळा येथील या पक्ष्यांच्या विणीच्या जागेचा परिसर वन विभागाने पर्यटकांसाठी १५ जुलैपर्यंत बंद ठेवला आहे. ऐन विणीच्या हंगामात या पक्ष्यांच्या छायाचित्रणासाठी अभयारण्यात मोठय़ा संख्येने छायाचित्रकार येतात.  छायाचित्रे काढताना त्यांची पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत होणारा व्यत्यय लक्षात घेता वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने एखाद्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी काही भाग विशिष्ट कालावधीकरिता संरक्षित करण्याचा निर्णय प्रथमच विभागाने अमलात आणला आहे. त्यामुळे कर्नाळा अभयराण्यातील ठरावीक परिसरात पर्यटकांना प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असले तरी येऊरच्या जंगलात आणि मुंब्रा येथील पारसिकच्या डोंगराजवळ हा पक्षी दिसू लागल्याने पर्यटकांची पावले ठाण्याच्या दिशेने वळत आहेत.

निसर्गसौंदर्यामुळे ठाण्यात आश्रय?

* तिबोटी खंडय़ासारखे पक्षी विणीच्या हंगामासाठी दक्षिण भारतातून ठाणे, मुंबईच्या जंगल परिसरात दाखल होतात.  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अंडी उबवून झाल्यानंतर ते पुन्हा दक्षिण भारतात परततात.

* तिबोटी खंडय़ा हा मानवी चाहुलीच्या बाबतीत अतिसंवेदनशील आहे. एखाद्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप आढळला तर तो त्याचे घरटे तेथे बांधतच नाही.

* सर्वसाधारणपणे नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस कडेला असणाऱ्या मातीमध्ये हे पक्षी बीळ खणून त्यामध्ये त्यांचे घरटे तयार करतात.

* पावसाळ्याच्या काळात येऊरच्या जंगलात आणि पारसिकच्या डोंगरात अनेक असे झरे आणि ओढे तयार होत असल्यामुळे तिबोटी खंडय़ा या परिसरात दिसू लागला आहे, असे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

तिबोटी खंडय़ाची वैशिष्टय़े

* शरिरावर जांभळय़ा, गुलाबी, निळय़ा रंगछटा.

* नारंगी, पिवळे पोट आणि लाल रंगाची लांब चोच.

* लांबी साधारण १३ सेंटीमीटर.

First Published on July 13, 2019 1:16 am

Web Title: tibetan kingfisher in south india in the yeoor abn 97
Just Now!
X