ठाणेकरांना पुरेशी सेवा देण्यात अपयशी ठरत असलेल्या ठाणे परिवहन उपक्रमावर फुक्कटय़ा प्रवाशांचा भार पडत आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ३५ तिकीट तपासनीस आहेत. प्रत्येक तिकीट तपासनीसाला किमान ४० हजार रुपये पगार असून या सर्व तिकीट तपासनीसांकडून महिन्याकाठी जेमतेम १२०० रुपयांचा दंड जमा होत असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारच्या स्थायी समितीमध्ये उघड आली आहे.
महापालिकेपाठोपाठ परिवहन उपक्रम आर्थिक डबघाईला आली असतानाच फुकटे प्रवासी शोधण्यात तिकीट तपासनीसांना का अपयश येत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला.
मुंब्रा रेतीबंदर भागातील परिवहन सेवा बंद करण्यात आल्याच्या मुद्दा उपस्थित करत काही सदस्यांनी परिवहन प्रशासनाला धारेवर धरले. प्रत्येक तपासनीसाला लक्ष्य ठरवून दिले जात असतानाही त्यांच्याकडून त्याप्रमाणे कारवाई होत नाही. त्यामुळे तिकीट तपासनीस कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप यावेळी सदस्यांकडून करण्यात असून ठाणे परिवहन प्रशासनानेही तशी कबुली बैठकीत दिली. परिवहनच्या ताफ्यात ३५ तिकीट तपासनीस असून प्रत्येकाला किमान ४० हजार रुपये पगार आहे. मात्र, त्यांच्याकडून महिन्याकाठी जेमतेम १२०० रुपयांचा दंड जमा होत असल्याचा मुद्दा नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी तिकीट तपासनीसांना कामाला लावा अन्यथा कामचुकार तपासनीसांवर कारवाई करा, असे आदेश परिवहन व्यवस्थापकांना दिले. तसेच व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनीही अशाप्रकारे तिकीट तपासणीचे काम करण्यास पाठवावे आणि परिवहनचे उत्पन्न वाढविणाऱ्यावर भर द्यावा, असे सांगत मी स्वत:  महिन्यातून एकदा प्रवाशांचे तिकीट तपासणीचे काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.