येऊरमधील हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बुधवारी सकाळी बिबटय़ाचे १५ दिवसांचे पिल्लू आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरी वस्तीत आपल्या आईसोबत आलेल्या या पिल्लाची ताटातूट झाली असावी, असा वनअधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळेच या बिबटय़ाच्या पिल्लाला आपल्या निगराणीत हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ ठेवून मादी बिबटय़ाची प्रतीक्षा करण्याची योजना वनअधिकाऱ्यांनी आखली आहे.

बुधवारी पहाटे   येऊर येथील उद्यानात काही नागरिकांना हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बिबटय़ाचे पिल्लू आढळले. त्याआधी येथील खुल्या व्यायामशाळेजवळ नागरिकांना बिबटय़ाचे दर्शन झाले.   बिबटय़ाच्या पिलाची माहिती उद्यानातील अधिकाऱ्यांना देण्यात आली.  त्यानंतर पिल्लू वनाधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आले. या बिबटय़ाची वैद्यकीय चाचणी करण्याचे काम दुपारी सुरू होते. चाचणी अहवालानंतर पिलाला त्याच्या आईजवळ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ज्या ठिकाणी पिलाला त्याच्या आईने सोडले, त्या ठिकाणी सोडता येईल का, याचा विचार केला जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.

भेटी लागी जिवा..

बिबटय़ाच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर वन विभागाकडून आई आणि पिलाची भेट घडवून आणण्यात येणार आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी दिली.  ज्या ठिकाणी बिबटय़ाचे पिल्लू सापडले, नेमक्या त्याच ठिकाणी  पुन्हा त्याला ठेवण्यात येणार आहे. पिलाची आई पिलाच्या शोधात त्या ठिकाणी पुन्हा येण्याची  शक्यता असल्याने वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.  दरम्यान या काळात पिल्लू ठेवण्यात येणार असलेल्या परिसरात वन अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर सामान्य नागरिकांना फिरकण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच वाट पाहूनही पिलाला जन्म देणारी बिबटय़ा मादी पिलाला घेण्यासाठी परत न आल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पिलाला ताब्यात घेऊन त्याची देखभाल वन विभागाकडून करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या या पिलाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुरुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. हे पिल्लू नर बिबटय़ा असून ते दहा ते १५ दिवसांचे आहे. – डॉ. शैलेश पेठे, पशूवैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय उद्यान