वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

शहापूर तालुक्यातील शिरोळ वनपरिक्षेत्रातील अजनुप गाव परिसरात बिबटय़ाचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने या परिसरात गस्त वाढविली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्याच्या अजनुप गावामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबटय़ा दिसत असल्याचे येथील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच मंगळवारी सकाळच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या एका बकरी फार्ममधून दोन बकऱ्यांना बिबटय़ाने नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शिरोळ विभागाचे वनपाल विजय गायकवाड आणि सहकारी तसेच इतर वनरक्षक यांनी या भागात पाहणी केली असता बिबटय़ांच्या पायाचे ठसे आढळल्याने बिबटय़ाचा वावर असल्याचे समोर आले आहे. तसेच बिबटय़ाची विष्ठा दिसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन बिबटे नसून एकच बिबटय़ा वावरत असल्याचे वनाधिकारी विजय गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, हा बिबटय़ा जंगलात आणि शेतावर नदीकाठी वावरत असल्याने परिसरातील नागरिकांनी या भागात जाऊ  नये. तसेच सध्या भात झोडणी शेतातील खळ्यावर केली जात असल्याने लहान मुलांना या ठिकाणी घेऊन जाऊ नये असे आवाहन वन विभागाकडून गावकऱ्यांना करण्यात आले आहे. तर या परिसरात रात्रीची गस्त वन विभागाकडून वाढवण्यात आली आहे. असे असले तरी बकऱ्यांवर झालेल्या हल्लय़ाबाबत आणि बिबटय़ाने बकरी खाल्ल्याबाबत वनाधिकारी विजय गायकवाड यांनी या माहितीला दुजोरा दिला नाही. ज्या फार्ममधून बिबटय़ाने बकऱ्या खाल्लय़ाचा दावा करण्यात आला आहे त्या फार्म मालकाने उर्वरित सुमारे ४० बकऱ्या खर्डी येथे स्थलांतरित केल्याचे सांगण्यात आले.