डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील अपंगांना ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग (रॅम्प) खराब झाल्याने त्यांच्या त्रासात भर पडली आहे. दुचाकी सायकल या रॅम्पवरून चढविता येत नाहीत. अनेक अपंग रंगमंदिरात नियमित नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी येत असतात. त्यांना रॅम्पवरून कोणाचीही मदत न घेता थेट रंगमंदिरात पोहोचणे सहज शक्य होते. गेल्या काही महिन्यांपासून रॅम्पवरील लाद्या निघाल्याने तेथून अपंगांना सायकली चढविणे, उतरविणे अवघड होत आहे, अशा तक्रारी अपंग संस्थांनी केल्या आहेत.
सावित्रीबाई फुले रंगमंदिरात भरारी अपंग अस्थिव्यंग संस्थेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अपंग व्यक्ती मोठय़ा संख्येने आपल्या सायकलवरून आल्या होत्या. कार्यक्रमासाठी आलेल्या अपंगांनी स्वबळावर रॅम्पवरून सायकल रंगमंदिरात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु रॅम्पच्या मार्गातील लाद्या निघाल्या असल्याने अपंग व्यक्तींना तेथून सायकल चढविणे शक्य झाले नाही. अखेर सायकली रंगमंदिराच्या बाहेर ठेवीन अपंगांना उचलून सभागृहात आणण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.
रंगमंदिरातील कामांसाठी पालिकेने अर्थसंकल्पात सुमारे दोन कोटींची तरतूद केली आहे. या निधीचा महापालिका विनियोग करत नाही, अशा तक्रारी आहेत. रंगमंदिराच्या व्यवस्थापकांना लाद्या निघाल्या आहेत हे कळत नाही का, असे प्रश्न अपंग व्यक्तींच्या संस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहेत .नाटक पाहण्यासाठी आलो की रंगमंदिरात जाण्यासाठी कोणाची तरी मदत घेऊन मग सायकल घेऊन आत जावे लागते. अशी मदत करण्यासाठी प्रत्येक जण तयार असतोच, असे नाही. आणि सतत दुसऱ्याची मदत घेऊन रंगमंदिरात जाणे योग्य दिसत नाही, असे यापैकी काहींनी सांगितले. महापालिकेने तातडीने रॅम्पच्या ठिकाणी लाद्या बसवून घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेच्या अभियंत्याने हे काम तातडीने करण्यात येईल, असे सांगितले.