बदलापुरातील बेलवली भुयारी मार्ग नेहमीच पाण्याखाली; पूर्व-पश्चिम ये-जा करताना अडचणी

बदलापूर : बदलापूर शहरातील बेलवली परिसरात पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेला भुयारी मार्ग नागरिकांसाठी त्रासदायक अधिक ठरू लागला आहे. चुकीच्या बांधणीमुळे या भुयारी मार्गात नेहमीच पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होत आहे. बेलवलीतील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तर नागरिकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. अशाच पाण्यातून निघालेल्या अंत्ययात्रेची छायाचित्रे मंगळवारी प्रसारित झाल्यानंतर शहरवासीयांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

बेलवली हा परिसर रेल्वे रुळांमुळे दोन भागांत विभागला गेला आहे. यातील बहुतांश निवासी परिसर पश्चिमेकडे असून नजीकची स्मशानभूमी मात्र पूर्व भागात आहे. येथील रहिवासी स्मशानभूमीत जाण्यासाठी पूर्वी रूळ ओलांडून जात असत, मात्र रेल्वे रुळांवरील अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे भुयारी मार्ग उभारला. तसेच रुळांलगत मोठय़ा भिंती उभारून मार्ग बंद केले. परिणामी भुयारी मार्गातून जाण्याखेरीज नागरिकांना गत्यंतर नाही.

रेल्वे प्रशासनाने उभारलेला भुयारी मार्ग हा तांत्रिकदृष्टय़ा चुकल्याने उभारणीपासूनच यात पाणी साचते. त्यावर तोडगा काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाची खोली कमी करून पाण्याचा निचरा होण्याची सुविधा केली. मात्र या भागातून वाहणाऱ्या नाल्याच्या पातळीपेक्षा हा मार्ग खाली असल्याने यात पाणी साचण्याचे प्रकार सुरूच राहिले. अनेकदा या पाण्यात चारचाकी  बेलवली पश्चिमेतून पूर्व भागात जाण्यासाठी १०० मीटर पार करावे लागतात. मात्र बेलवलीतून शहरातल्या एकमेव उड्डाणपुलावरून जायचे असल्यास सुमारे अडीच ते तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यात सध्या उड्डाणपुलावर असलेल्या खड्डय़ांमुळे येथून प्रवास करताना किमान अर्धा तास खर्ची घालावा लागतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे.

गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा नेणे हा प्रकार संतापजनक होता. आम्ही अनेकदा याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र रेल्वे आणि पालिका प्रशासनाच्या वादात आम्हाला भयंकर त्रास सहन करावा लागतो आहे. येथे पादचारी पुलाची गरज आहे.

– किशोर पाटील, नागरिक, बेलवली बदलापूर.

या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात आली, मात्र ती यंत्रणा तोकडी पडत असून त्यात सुधार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे प्रशासनाशी संवाद साधून यावर तोडगा काढला जाईल.

– योगेश गोडसे, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका.