20 November 2019

News Flash

..तर दिव्यात हाहाकार उडाला असता!

पिंपांतून वायुगळती झाली असती तर, मोठी दुर्घटना घडण्याचा धोका होता.

वायुगळती

दिवा येथील कचराभूमीवर रसायनाने भरलेली तीन पिंपे फुटून झालेली वायुगळती आटोक्यात आणण्यात अग्निशमन दल व ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आले असले तरी, या ठिकाणी अशा प्रकारची ५८ पिंपे आढळून आली आहेत. या सर्व पिंपांतून वायुगळती झाली असती तर, मोठी दुर्घटना घडण्याचा धोका होता. कचराभूमीवर अशा प्रकारे नेहमीच रासायनिक कचरा टाकण्यात येत असल्याने दिवावासीयांच्या सुरक्षितता आणि आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रसायनांनी भरलेली पिंपे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतून दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे स्वत:ची कचराभूमी नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन शहरातील कचरा विविध ठिकाणी टाकत असून दिवा भागातील खाडी परिसरातील खासगी जमिनींवर कचरा टाकला जातो. ही कचराभूमी दिव्यातील लोकवस्तीपासून अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावर आहे. या कचराभूमीवर टाकण्यात आलेल्या पिंपांतून मंगळवारी रात्री वायुगळती झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण धुरकट झाले. कचराभूमीवर लागणाऱ्या आगीचा धूर असेल, असे समजून परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळाने हा धूर आणखी पसरून अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. याशिवाय डोळे चुरचुरणे, पोटात मळमळणे अशा तक्रारी येऊ लागल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दाखल झाले व त्यांनी गळतीचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी या ठिकाणी रसायनांनी भरलेले ५८ पिंप आढळले. त्यापैकी तीन पिंपांतून वायूगळती होत होती. अग्निशमन दलाच्या एका जवानास या वायूगळतीचा त्रास झाला असून त्यास उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळपर्यंत पिंपातील रसायन संपल्याने वायुगळती कमी होऊन धूर ओसरला. मात्र, तीन पिंपांतील वायुगळतीने एवढा त्रास झाला असताना, सर्व पिंपे फुटली असतील तर, मोठा हाहाकार उडाला असता, असे जाणकारांनी सांगितले.
अशा स्वरुपाचे रसायन कोणत्या कंपनीमध्ये तयार होते आणि कोणत्या भागातून ते आले असावे, याचा सविस्तर तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली. या घटनेप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ामध्ये जाणीवपूर्वक मानवी जीव धोक्यात घालणे असे कलम लावण्यात आले असून हा कलम अजामीनपात्र आहे,असेही त्यांनी सांगितले.

‘आग कचराभूमीवर नाहीच’
दरम्यान, वायुगळती व आग कचराभूमी लागलेली नाही, असा खुलासा महापालिकेने केला आहे. मंगळवारी सायंकाळी डवले गावाजवळ असलेल्या खाडी किनाऱ्याजवळ काही अनोळखी व्यक्तींनी ज्वालाग्राही विषारी रसायनाची ५८ पिंपे खासगी मालकीच्या मोकळया जागेत ठेवले होते. त्यातील चार पिंप त्यांनी उघडल्यानंतर त्या ठिकाणी आधीच असलेल्या जुन्या रसायनाची आणि नवीन रसायनाशी प्रक्रिया होवून आग पकडली आणि धूर निर्माण झाला, असे तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि., या कंपनीच्या तज्ञांनी म्हटल्याचे पालिकेने सांगितले आहे. हे सर्व पिंप तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड कंपनीकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, प्रदुषण नियंत्रण मंडळाने पिंपातील रसायनाची तपासणी केली असून त्यामध्ये ‘टोल्यून’ हा घटक सापडला आहे, अशी माहिती पालिकेने दिली.

First Published on December 10, 2015 5:19 am

Web Title: tmc and fire brigade stop gas leakage in diva garbage land
टॅग Gas Leakage,Tmc
Just Now!
X