ठाणे शहराच्या सार्वागीण विकास प्रक्रियेत रहिवाशांनीही खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला असून परिसराचे सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर तसेच नियमित वृक्ष लागवड करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांच्या मालमत्ता करात पाच टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी जाहीर केला. महापौरांच्या या प्रस्तावाला आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पाठिंबा दिला असून एका स्पर्धेच्या माध्यमातून शहर स्वच्छता आणि पाणी-वीज बचतीच्या निकषांच्या आधारे ही कर सवलत पदरात पाडून घेण्याची अनोखी संधी रहिवाशांना उपलब्ध झाली आहे.
शहरातील गृहसंकुले आणि झोपडपट्टय़ांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्या इमारतींमधील रहिवाशांच्या मालमत्ता करात दर वर्षी पाच टक्के सवलतीसोबत झोपडपट्टी विभागात पाच ते दहा लाखांपर्यंतची विकासकामे करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या स्पर्धेची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवसापासून, १४ एप्रिलपासून सुरू होणार असून ३० एप्रिल अखेरची तारीख आहे.