प्रकल्प व्यवस्थापन कंपनीला दोन मजली जागा मोफत;  पालिकेचे ६० कोटींवर पाणी

ठाणे शहरातील नागरिकांमध्ये सायकलद्वारे प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता ठाणे महापालिका राबवत असलेला प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शहरातील मोक्याच्या जागा सायकल स्थानकासाठी देऊन त्यावर जाहिरातींचे हक्क संबंधित कंपनीला बहाल करणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता या कंपनीला पालिकेच्या इमारतीमधील दोन मजले पुढील १५ वर्षे मोफत वापरासाठी दिले आहेत. विशेष म्हणजे, याच इमारतीतील एका शासकीय कार्यालयाकडून पालिका दरमहा ९ लाख रुपये भाडे वसूल करते. कंत्राटदार कंपनीला दोन मजले मोफत दिल्यामुळे पालिकेला सुमारे ६० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

ठाणे शहरातील अंतर्गत प्रवास स्वस्त, सुसह्य़ आणि प्रदूषणरहित पर्याय देण्यासाठी महापालिकेने सायकल प्रकल्पाची योजना आणली. या योजनेकरिता शहरातील ५० महत्त्वाच्या जागांवर सायकल स्थानके उभारून त्या ठिकाणी ५०० सायकली नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. या कामाचा ठेका ‘साइन पोस्ट इंडिया प्राव्हेट लिमिटेड’ या संस्थेला देण्यात आला असून या कंपनीने शहरात अनेक ठिकाणी सायकल स्थानके उभारून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या स्थानकावरील सायकली ठाणेकरांना भाडय़ाने उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यातून कंपनीला उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय, सायकल स्थानकांवर जाहिरातींचे हक्क महापालिकेने देऊ केले असून त्यामधूनही कंपनीला उत्पन्न मिळणार आहे.

या प्रकल्पातील सायकलींच्या दुरुस्तीसाठी आणि कार्यालयासाठी संबंधित कंपनीने महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. त्यामुळे लोकमान्यनगर येथील महिला बचत गट भवनाची जागा महापालिकेने कंपनीला तात्पुरत्या स्वरूपात दिली आहे. असे असतानाच घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागातील महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील तळ आणि पहिल्या मजल्याची जागा संबंधित कंपनीला देण्याचा प्रस्ताव प्रशासनने तयार केला होता.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव नामंजूर केला होता. असे असतानाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विशेषाधिकारांतर्गत या प्रस्तावास मान्यता देऊन त्यामध्ये संबंधित कंपनीला तळ आणि पहिला मजल्यावरील जागा १५ वर्षांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने संबंधित कंपनीसोबत करार केला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिका आणि साइन पोस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून सायकल प्रकल्प राबविला जात असून तो सामाजिक प्रकल्प असल्याचा दावा करत आयुक्तांनी जयस्वाल यांनी त्यास मान्यता दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

‘एसआरए’कडून भाडेवसुली

घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागात महापालिकेने भाजी मंडईसाठी तळ अधिक दोन मजली इमारत उभारली असून या ठिकाणी तळ मजल्यावर भाजी मंडईसाठी ओटले बांधण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी अजूनही भाजी मंडई सुरू होऊ शकलेली नाही. तसेच याच इमारतीमधील दुसरा मजला झोपडपट्टी पुनर्विकास योजना या शासकीय विभागाला भाडे तत्त्वावर दिला असून या जागेचे क्षेत्रफळ ७ हजार १४४ चौरस फूट इतके आहे. या विभागाकडून महापालिका महिन्याकाठी ८ लाख ८२ हजार रुपये भाडे आकारत असून त्यामध्ये दर वर्षी दहा टक्के वाढ करते. तर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागेचे क्षेत्रफळ ७ हजार ५६४ चौरस फूट इतके असून तळमजल्यावरही इतकीच जागा आहे. या जागा पंधरा वर्षांसाठी मोफत दिल्यामुळे महापालिकेला सुमारे ६० कोटी रुपयांच्या उत्पन्नास मुकावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहरातील मोक्याच्या जागा महापालिकेने सायकल स्थानकांसाठी दिल्या आहेत. मात्र, या योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या योजनेचा उद्देश सफल झाला नसला तरी संबंधित कंपनीला स्थानकावरील जाहिरातीमधून उत्पन्न मिळत आहे. आता कंपनीला कार्यालयासाठीही मोफत जागा दिली जात आहे. याचा आम्ही विरोध करू.

– मिलिंद पाटील, विरोधी पक्ष नेते, ठाणे महापालिका